गणेश प्रभाळे
दिघी : दिवेआगर समुद्रकिनारी शनिवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनेक मूर्ती ह्या भग्नावस्थेत पाहायला मिळाल्या. दरवर्षी समुद्रकिनारी हे चित्र पाहायला मिळत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी बंदी आणण्याचा विचार करत असल्याचे दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे यांनी सांगितले.

गणेशोत्सवात घराघरात गणेश मूर्तीचे पूजन करून साजरा केला जातो. पूर्वीपासून गणेश मूर्ती ही मातीचीच केली जात होती. ती पाण्यात सहज विरघळत असते. पण गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्या बनवल्या जात आहेत. त्या पाण्यात विरघळत नसल्याने समुद्र, नदी, तलाव, नाल्यात त्या मुर्त्या विसर्जन झाल्यावर बरेच महिने भग्न अवस्थेत दिसतात. ज्या भावनेने मनोभावे मूर्तीची पूजा केलेली असते त्या अशा अवस्थेत पाहील्यावर धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. पीओपीच्या मूर्ती ह्या शाडूच्या मुर्तींपेक्षा स्वस्त असल्याने त्यांना मोठी मागणी असते. मात्र, समुद्रकिनारी त्या विसर्जन केल्यानंतर कालांतराने त्या न विरघळता किनाऱ्याला लागलेल्या दिसतात.
दिवेआगरचे सरपंच कोसबे यांच्यासह या स्वछतेला मोरेश्वर चोगले, नथुराम रिळकर, नंदकुमार रिळकर, मानस रिळकर, हर्षल रिळकर, मंत्रा चोगले, तन्वी चोगले यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी सरपंच कोसबे यांनी सांगितले कि, दिवेआगर समुद्रकिनारी पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आम्ही आवाहन दरवर्षी करतो आणि दरवर्षी ह्या घटना घडतात. शनिवारी विसर्जनानंतर समुद्राला भरती होती व रविवारी आम्ही तरुणांनी दीडशे ते दोनशे मूर्ती पुन्हा विसर्जित केल्या. प्रत्येकांनी हे समजून घेतले पाहिजे. आनंदात सण साजरे करतो पण नंतर आशा घटनांनामुळे वाईट वाटते.
