घन:श्याम कडू
उरण : ग्रामपंचायत प्रशासनाला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. घर बांधण्यासाठी रीतसर जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये व नगरपालिका हद्दीत या नियमांचे उल्लंघन करून बेधडकपणे बांधकामे सुरू आहेत. अशा प्रकारे चाणजे ग्रामपंचायतमध्ये पाच मजली इमारत व म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत एका इमारतीचे भर रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करून बांधकाम सुरू आहे. याबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत सर्व्हे क्रमांक 139/2 हि जमिन प्रदीप म्हात्रे यांच्या मालकीची आहे. त्यांचे उभ आयुष्य मुंबईमध्ये गेले आहे. त्यांनी गावाच्या रहदारीचा कोणताही विचार न करता नगररचना विभागाला बासनात गुंडाळून थेट रस्त्यावर बेकायदेशीर इमारतीच्या पायऱ्या बसविण्याचे काम म्हातवली विभागात मोक्याच्या ठिकाणावर द्वारकानाथ चौक येथील इमारत बांधणाऱ्या बिल्डरने सुरू केले आहे.
सर्व्हे क्रमांक 139/2 ही जमिनीवर सन 1989 पर्यत गुरांचा दवाखाना म्हणुन महसुल दप्तरी नोंद आहे. संपुर्ण नागाव-म्हातवली व केगावच्या शेतकऱ्यांना मध्यवर्ती ठिकाण म्हणुन पंचायत समिती अंतर्गत सदर जमिनीवर पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. सदरची मिळकत जमीनदोस्त करित प्रदीप रामा म्हात्रे, अनघा श्रीकांत म्हात्रे, स्वाती श्रीनिवास म्हात्रे, घर क्रमांक 83/अ,83/ब ,83/क एकुण 500 चौरस फुटांचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम करीत असताना शासनाच्या वास्तूचे अधिकार संपुष्टात आणीत सन 2021 मधे मालकीची इमारत जिर्ण झाल्याने नूतनीकरण करुन नविन इमारत बांधण्याकरिता ग्रामपंचायत म्हातवली ग्रामपंचायतकडे साध्या कागदावर अर्ज करण्यात आला होता. ग्रामपंचायत म्हातवलीने त्वरित नाहरकत दाखला देत दस्तुरखुद्द ग्रामसेवकने प्लॅन मंजुर करुन एक प्रकारे सार्वजनिक रस्ता बिल्डरच्या घशात घातला आहे.
सदर इमारतीचे बांधकाम एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य करीत असल्याचे समजते. म्हातवली ग्रामपंचायत सदर सदस्याच्या दबावाखाली कार्यरत असल्याची कुजबुज इतर समस्यांमधे असल्याचे एका विद्यमान सदस्याने बोलुन दाखविले आहे. मुख्य म्हणजे ज्या जमिनीवर ही इमारत उभी आहे, त्या जमिनीचा मालक प्रदीप रामा म्हात्रे हा मुंबई येथे वास्तव्यास आहेत.
सदर इमारतमध्ये संपुर्ण तळमजलयावर गाळे असुन एका गाळयाची किमत अंदाजे 35 लाख एवढी असल्याचे समजते. इमारतीला कोणतीही पार्किंग व्यवस्था नसल्याने सदनिका धारकांची वाहने व दुकानदारांची वाहने रस्त्यावर लागणार असुन भविष्यात नागाव – म्हातवली करिता ही मोठी डोकेदुखी होणार असल्याचे खुद्द ग्रामपंचायत सदस्यच कबूल करतात. याचा सारासार विचार बिल्डर लोकप्रतिनिधींनी केलेला दिसत नाही. ग्रामपंचायतमध्ये निवडून यायचे आणी पद,सत्ता सत्तेतून पैसा व पैशातून राजकारण हे गणित नागाव-महातवलीत सर्रास बघावयास मिळत आहे. ओएनजीसी सारख्या प्रकल्पात केवल मोठ मोठे कंत्राट मिळविण्यासाठी ग्रामपंचायतची पद मिळवली जातात असे ग्रामस्थच सांगतात.
वर्षानुवर्ष पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींनी सदर अनधिकृत बेकायदेशीर इमारत बांधताना गावाच्या चौकचा रस्ता ही गिळंकृत केल्याने सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करित आहेत. मात्र म्हातवली ग्रामपंचायत जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे बोलले जाते. याबाबत काहींनी लेखी तक्रारी करूनही जिल्हा परिषद व उरण पंचायत समिती प्रशासनही याची पाठराखण करीत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लवकरच एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल होऊन सदर इमारत जमीनदोस्त होण्याची चर्चा सध्या गावाच्या नाक्यावर एकावयास मिळत आहे.
