शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार फळ, माणगावात भात पिकाला हवामान पोषक
सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्रात शासन व शेतकरी प्रगती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. एवढेच नव्हे तर पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी भर दिला जात आहे. शासनाकडून पिक विमा, पेरणी व लागवडीसाठी तसेच कीटकनाशकासाठी मार्गदर्शन दिले जाते. इथली शेती व शेतकरी टिकला पाहिजे यासाठी शासन वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहे. तर दुसऱ्या बाजूला इथल्या शेतकऱ्याची जमीन विविध प्रकल्पासाठी संपादित केली जात आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी पुरता उध्वस्त होत असून सध्या माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरणासाठी जमीन भू-संपादनाचे काम वेगात सुरु आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यात वरकस व भात पिकाचे क्षेत्र यंदाचे वर्षी घटले असले तरी माणगाव तालुक्यात २०६ गावातील शेतकऱ्यांनी यंदाचे वर्षी १२५०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली आहे. यंदाचे वर्षी पिकाला पोषक असा पाऊस पडल्याने भाताचे पिक पोटऱ्यात आले असून ते फुलले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात पावसाने दडी मारल्याने बियाणे वेळेवर रुजले नाही. त्यानंतर अतिवृष्टीचा या रोपांना फटका बसला होता. त्यामुळे खलाटीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने यंदाचे वर्षी भात लावणी करण्याचे संकट शेतकऱ्यापुढे उभे ठाकले होते. त्यामुळे ८० टक्के भात लावणी उशिरा करण्यात आली होती. सुरवातीला १२ टक्के झालेल्या भात लावणी व हळवे पिक हे आता कांही ठिकाणी पोटऱ्यात आले आहे. राज्यासह कोकणात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव शासना मार्फत करून त्यांचे मनोबल वाढण्यास मदत केली जाते. त्याचबरोबर नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी केला जात आहे. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान नेहमीच मिळत असते.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतानाच विविध प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारून इथली जमीन काढून घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी नावा पुरता उरला आहे. माणगाव तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर शेतीचे क्षेत्र घटत आहे. सरसरी गेल्या ६ वर्षात हे क्षेत्र कमालीचे घटले आहे. गेल्या वर्षी भात पिकाचे सरासरी क्षेत्र १२५८९ होते. यंदा ८९ हेक्टर एवढे भात पिकाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदाचे वर्षी शेतकऱ्यांनी १२५०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली आहे. भात पिकावर बुरशीजन्य रोग पसरण्याची भीती व्यक्त होत असून खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता बदलत्या हवामानामुळे नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव अंतर्गत खरीप हंगामामध्ये भात पीक कीड व रोग सर्वेक्षण योजना गाव पातळीवर राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत गावांमध्ये शेतकऱ्यांचे भात पिकाचे प्लॉट निवड करण्यात आली असून यामध्ये रोपवाटिका ते पिकाची परिपक्वता अवस्था यावेळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना कीड व रोग याची लक्षणे, उपाययोजना आवश्यक फवारणी इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
-अजय वगरे
तालुका कृषी अधिकारी, माणगाव.
