किरण लाड
नागोठणे : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कचरा मुक्त भारत करण्यासाठी स्वच्छता सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीने रविवार, दि. १ आक्टोंबर रोजी सामुदायिक श्रमदान कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कचरा मुक्त भारत करण्यासाठी दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2023 पर्यंत गांधी जयंतीचे औचित्य साधुन स्वच्छता सेवा अभियानाची राज्यातील शहरे, गाव पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. या कार्यक्रम अंतर्गत सुका, ओला कचरा वर्गीकरण करणे, प्लास्टिक वापरावर पूर्णतः बंदी घालणे, कच-यापासून उत्पन्न घेणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियनातंर्गत गावातील सार्वजनिक चौकाचौकात नागरिकांच्या श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे. या देशहित कार्यक्रम अंतर्गत श्रमदानासाठी गावातील सर्व नागरिकांनी, युवक मंडळानी, सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, धार्मिक मंडळाचे पदाधिकारी, श्री सदस्य, विविध बचत गटाचे सदस्य, शासकीय कर्मचारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी रविवार, दि. १ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता माता जोगेश्वरी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
