प्रतिनिधी
माणगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना जानेवारी २०२३ मध्ये माणगाव तालुक्यात घडली असून याबाबत पीडित मुलीने बुधवार, दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील आरोपी गिरीश दिलीप नवगणे (वय २१) याने फिर्यादी पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही जानेवारी २०२३ मध्ये तिला आपल्या राहते घरामध्ये बोलावून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात काँ. गु. रजि. नं. ३०७/२०२३ भादवि संहिता कलम ३७६(२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ ( पोस्को) कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.