प्रतिनिधी
नागोठणे : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नागोठण्यात रविवारी (ता. १) ”स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात जमा होऊन स्वच्छता सेवा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, महिला वर्ग तसेच ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रंजना राऊत, बचत गटांच्या अध्यक्षा अनिता पवार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष किर्तीकुमार कळस, ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, बालवाडी सेविका व मदतनीस, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानाच्या नियोजीत कार्यक्रमानुसार ग्रामस्थांनी श्रमदान करीत ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर, ग्रा. पं. कार्यालय परिसराची स्वच्छता केली. यावेळी खडकआळी ग्रामस्थांनी श्रमदान करून संपूर्ण खडकआळीचे रस्ते साफ केले. स्वच्छता हिच सेवा मानून श्रीसदस्यांनी श्रमदान करीत प्राथमिक आरोग्य केंद्र ते रेस्ट हाऊस रस्त्याचे दुर्तफा, रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली.

आजच्या स्वच्छता श्रमदान कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागातील ग्रामस्थांनी आपआपल्या परिसरात श्रमदान करून शासनाचे कचरा मुक्त भारत अभियानात सहयोग दिला. शासन आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या स्वच्छता सेवा अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहनाला मान देऊन १ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रमदानातून गावातील स्वच्छता करुन देशसेवेसाठी सहयोग दिलेल्या सर्व उपस्थित ग्रामस्थांचे, श्रीसदस्यांचे ग्रामपंचायतीचेवतीने ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांनी आभार मानले.
