• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

येणाऱ्या निवडणुकीत आ. भरतशेठ गोगावले राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये विक्रमी मतांनी निवडून येतील

ByEditor

Oct 1, 2023

निजामपूर नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

सलीम शेख
माणगाव :
जनतेशी भावनिक नाते जोडणारा संवेदनशील असा आपला लोकप्रतिनिधी आ. भरतशेठ गोगावले असून एक चांगले नेतृत्व तुम्हाला या मतदार संघात मिळालेले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. भरतशेठ गोगावले हे राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी निजामपूर नळपाणी योजनेच्या भूमिपूजन व निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व विभागातील विविध गावांतील असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या खात्याच्या निधीतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आ. भरतशेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नांने व राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड- रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघातील निजामपूर, कोस्ते खुर्द व कडापे या तीन ग्रामपंचायतींना सुमारे २१ कोटी रुपये किमतीची रवाळजे येथून नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली. या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दि.३० सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड- रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते व मतदार संघाचे आ. भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ना. उदय सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे कोकण विभाग संघटक विकास गोगावले, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख अरुण चाळके, द. रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, द. रायगड युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुका प्रमुख अँड. महेंद्र मानकर, उपतालुका प्रमुख नितीन पवार, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, कडापे सरपंच मारुती मोकाशी, माजी सरपंच हमजा जळगावकर, निजामपूर विभाग प्रमुख मनोज सावंत, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर पवार, संजय गुळंबे, युवासेना तालुका प्रमुख राजेश कदम, महिला संघटक अरुण वाघमारे, महिला संपर्क प्रमुख गुलाब पवार आदींसह निजामपूर ग्रामपंचायतीचे सदस्य, सदस्या, शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच विभागातील विविध गावांतील ग्रामस्थ बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ना. उदय सामंत पुढे म्हणाले कि, आ. भरतशेठ गोगावले यांनी सांगितले कि, २१ कोटी रुपये या निजामपूरच्या नळपाणी योजनेसाठी मी मंजूर केले. भरतशेठनी या कामाकरिता सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला. भरतशेठ तुम्ही सातत्याने आपल्या कार्याच्या जोरावर या मतदार संघातून निवडून येणार. तुमची नाळ मतदार संघातील लोकांशी जुळलेली आहे. महिलांची मोठी संख्या आजच्या कार्यक्रमाला याठिकाणी दिसत आहे. तुम्ही नळपाणी योजना दिल्यामुळे महिला आनंदित दिसत आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नासंदर्भात येत्या १५ दिवसांत आपण कंपनी प्रशासनाची बैठक घेऊ. मी रायगडमध्ये फक्त सयाजीराव म्हणून काम करतो. भरतशेठनी पात्र आणावे मी सही करावी. आपण सर्वजण भाग्यवान आहात कि तुम्हाला भरतशेठ सारखा चांगला लोक प्रतिनिधी मिळाला आहे. ६ महिन्यांपूर्वी भारतशेठनी मला फोन केला. त्यांनी सांगितले निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मला निधी हवा आहे. २ कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर केला असून लवकरच त्याची निविदा निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेशी आपण सर्वांनी एकनिष्ठ राहून आ.भरतशेठ यांचे हात मजबूत करायला हवे. राजाभाऊ तुम्ही मनाचे मोठे आहात विभागातील विकास कामांसाठी तुमची तळमळ आहे. तुम्ही भरतशेठ सारखे चांगले नेतृत्व स्वीकारले आहे. येणारा आमदार, खासदार हा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या युतीचा असेल. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भरतशेठ स्वीकारतात. भरतशेठ सोबत काम करताना आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला एक मानसिक समाधान वाटते. भरतशेठ तुम्ही मागाल त्या पत्रावर मी सही करायला तयार आहे. भरतशेठ तुम्ही मंत्री, पालकमंत्री नसाल पण तुमच्या मतदार संघातील तुमची असणारी ताकद त्यांच्यापेक्षा मोठी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय वाईट केले. १८ ते २० तास ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताहेत. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी याठिकाणी दरड दुर्घटना घडल्यावर सकाळी ६:३० वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी पोहचले. तेव्हापासून सकाळी ११ :३० वाजेपर्यंत खुर्चीत न बसता त्यांनी आपले मदतकार्य सुरु केले. इर्शाळवाडीतील साडे पाच किलोमीटरची टेकडी मुख्यमंत्र्यांनी चढली असा मुख्यमंत्री यापूर्वी कधीच महाराष्ट्रात पहिला नाही. म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत आहोत. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आपण राजाभाऊ प्रवेश केलात याचा पश्चताप आपल्याला मुळीच होणार नाही असेही ते म्हणाले.

आ. भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले कि, निजामपूर वासियांना स्वच्छ सुंदर पाणी देण्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हातून झाले आहे. या पाणीयोजनेसाठी मागणी केल्यानंतर त्यांनी तत्वतः या योजनेला मान्यता दिली. ६ ते ७ महिन्यांत या योजनेचे काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी राजाभाऊ तुमची व विभागातील सर्व कार्यकर्त्यांची आहे. काळ कुंभे प्रकल्प व्हावा हि आपल्या सर्वांची इच्छा आहे. १९०० कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च अपेक्षित आहे. हे काम होणार असून आपण दिलेला शब्द कधीही वाया जाणार नाही. एवढे मोठे प्रकल्प होत असताना या भागातील लोकांना रोजगार व छोटे-मोठे ठेके भेटले पाहिजेत यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवा. हे काम झाल्यास जनता आपल्याला कधीही विसरणार नाही. कोशिंबळेचा पूल तुटला असून यालाही आपण निधी उपलब्ध करून द्यावा. विभागातील एकही गाव, वाडी, वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही. आम्ही काम करतोय आम्हाला सहकार्य करा. ५ वर्षातून एकदा आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. ५ वर्षातील १८२५ दिवस आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. सर्व पक्ष एकत्र आलोय आपण हातात हात घालून काम करू. मला आता चौकार मारायचा आहे. माझ्या मताधिक्यात आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वाढ होणार आहे. माणसाचा घर मोठे असण्यापेक्षा मन मोठे असावे असेही ते म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे कोकण विभाग संघटक विकास गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले कि, या विभागावर सातत्याने अन्याय झाला असून राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उद्योगमंत्री असताना स्वतःची पोळी भाजून घेतली. नोकरीच्या वेदना या विभागातील जनतेच्या आहेत असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत रायगडचा खासदार हा युतीचाच असेल असे सांगितले.

प्रास्ताविकात बोलताना निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे म्हणाले कि, निजामपूर ग्रामपंचायत हि तालुकयातील एक मोठी ग्रामपंचायत असून सव्वा लक्ख मतदार आहेत. ग्रामपंचायत हद्दीत सर्व खात्याची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पास्कोसारख्या कंपनीचे दूषित पाणी प्यावे लागत होते. माजी उदयोगमंत्र्यांसह अनेकांकडे गेली १० वर्ष आम्ही या पाणी योजनेसाठी मागणी केली. परंतु आम्हाला शुद्ध पाणी योजना मिळाली नाही. त्यानंतर आ. भरतशेठ यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी जातीने यामध्ये लक्ष घातले. यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली. यावेळी मंत्री सामंत यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना ताबडतोब तुम्ही निजामपूरला पाणी द्या असे आदेश दिले. सुरुवातीला या योजनेचे १३ कोटी रुपये अंदाजपत्रक होते. तेव्हा पाणी दिलेत तर आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द आपण दिला होता. दिलेला शब्द आपण पाळतो त्यांनी त्यांचा शब्द पळून १३ ऐवजी २१ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना निजामपूर ग्रामपंचायतीसाठी दिली. आज आम्ही २३ गावे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करतोय गरीब जनता आपल्या बरोबर आहे. निजामपूर भागात एमआयडीसी आली. गरिबांच्या जमिनी गेल्या. पण एकही स्थानिक इंजिनिअर झालेल्या, विविध कोर्सेस केलेल्या युवकांना याठिकाणी नोकऱ्या मिळाल्या नाही स्थानिकांवर अन्याय झाला. आ. गोगावले यांनी मी विरोधात असतानाही माझ्या १० मुलांना नोकऱ्या दिल्या. स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे यांच्यासह विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी ना. उदय सामंत व आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे यावेळी ना. उदय सामंत व आ. भरतशेठ गोगावले यांनी पक्षात स्वागत केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!