प्रतिनिधी
नागोठणे : दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी रोहा गटातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासन व राज्य शासनाचे आदेशान्वये व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आदेशानुसार रोहा पंचायत समिती अखत्यारीतील सर्व ग्रामपंचायत व प्राथमिक शाळांमध्ये ‘स्वच्छता हि सेवा’ विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासह विविध उपक्रमांचे आयोजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदिप बोंगे यांनी केले.
संपूर्ण रोहा तालुक्यात कचरा मुक्त भारत करण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान मोहिम राबविण्यात आली आहे. महात्मा गांधी जंयतीचे औचित्य साधून स्वच्छता सेवा अभियान कार्यक्रमा अंतर्गत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रोहा गट पंचायत समिती आवारात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती मार्फत घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक बंदी व स्वच्छता विषयक जनजागृती करणारे बॅनर्स, टी शर्ट वाटप करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गानी श्रमदान करीत कार्यालय आवारातील सर्व झाडे झुडपे, गवत छाटून परिसराची साफसफाई करुन ओला सूक्या कचऱ्याची वर्गवारी करुन शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली.
श्रमदानासाठी गटविकास अधिकारी कुलदिप बोंगे, विस्तार अधिकारी (पंचायत) सुनील गायकवाड, प्रशासक अधिकारी दिनेश वारंगे, प्रशासक अधिकारी श्रीमती गावंड, गटशिक्षण अधिकारी श्रीम. मेघना धायगुडे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. घाडगे तसेच पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग ग्रा. पं. विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.