प्रतिनिधी
महाड : विन्हेरे गावातील अशोक धाकू शिवदे नावाचा व्यापारी दुकानातील कचरा टाकण्यास नागेश्वरी नदीत गेला असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली. आज सकाळी त्याचा मृतदेह नागेश्वरी नदीच्या पात्रात आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विन्हेरे गावातील अशोक धाकू शिवदे (वय 72) ह्याचा गावातील ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्ये गोळ्या बिस्किटे व भाजीपाला विकण्याचा व्यवसाय असून काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर दुकानातील कचरा जवळील नागेश्वरी नदीच्या प्रवाहात टाकण्यासाठी गेला असता नदीला प्रचंड पाणी असल्याने पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली. नागेश्वरी नदीत कचरा टाकण्यात गेलेला व्यापारी अशोक धाकू शिवदे हा बराच वेळ येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील तरुणांनी रात्रीच नदीपात्रात शोध मोहीम चालू केली मात्र, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व नागेश्वरी नदीला असलेला प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहता तरुणांना रात्री शोध मोहीम अर्धवट थांबवावी लागली. अखेर सकाळी नागेश्वरी नदीच्या पात्रात एका आदिवासी व्यक्तीला अशोक शिवदे याचा मृतदेह पात्रातील उंबराच्या झाडाजवळ अडकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात कळविण्यात आले असून पोलिसांनी वैद्यकीय पथक घेऊन हा मृतदेह नागेश्वरी नदीच्या पात्रातून काढला असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.