• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

केएमजी विभागाच्या एकजुटीमुळे आमची पतसंस्था आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे -विलास चौलकर

ByEditor

Oct 2, 2023

श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

किरण लाड
नागोठणे :
आमची पतसंस्था कोणत्याही संस्थेशी स्पर्धा करीत नाही. आम्ही आमच्या पध्दतीने पतसंस्थेचे कामकाज करीत असतो, असे प्रतिपादन श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांनी केले. श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २५वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता हाॅटेल इंद्रप्रस्थ, काॅन्फरन्स हाॅल येथे आयोजित केली होती. त्यावेळी सभासदांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत चौलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेंद्र जैन, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, पतसंस्थेचे संस्थापक जयराम पवार, भाजप प्रणित राष्ट्रीय जनहित कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा श्रेया कुंटे, तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात चौलकर पुढे म्हणाले कि, श्री अष्टविनायक पतसंस्थेचा व्यवहार पारदर्शक असल्याने संस्थेला सतत तीन वर्षे ऑडीटचा ‘अ’ वर्ग मिळत आहे. पतसंस्थेच्या ठेवी २.५० कोटी पर्यंत गेलेल्या आहेत. त्या ठेवी येणाऱ्या काळात ५ कोटीपर्यंत नेण्याचा पतसंस्थेचा मानस आहे. नागोठण्यातील बहुसंख्य लोकांचा, व्यापारी वर्गांचा, नोकरदार वर्ग, सभासदांचा पतसंस्थेवर विश्वास असल्याने पतसंस्थेत रोजची ३ लाखापर्यंत पिग्मी जमा होते. ही गोष्ट आमच्या पतसंस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सन १९९८ साली केएमजी विभागातील ग्रामस्थांनी जे छोटसे रोपटे लावले होते त्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. आज पतसंस्था २५वे रौप्यमहोत्सवी वर्षे साजरा करीत आहे हे निव्वळ घडून आले ते केएमजी विभागातील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीच्या ताकदीमुळे शक्य झाले आहे. तसेच नागोठणे विभागातील ठेवीदार, कर्जदार, पिग्मी खातेदार, सभासद, हितचिंतक यांनी पतसंस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे घडले असून संस्थेच्या सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे सन २०२३ ते सन २०२८ सालाची पतसंस्थेची संचालकांची मंडळाची निवड बिनविरोध झाली आहे. या वर्ष अखेर पतसंस्थेची सभासद संख्या ६३५ आहे. ती पुढील वर्षात दुपट्टीने वाढविण्याचा शब्द या वार्षिक सभेमध्ये देतो असेही चौलकर म्हणाले.

यावेळी नागोठणे विभागात पहिला सीएनजी पंप चालू करुन अनेक सीएनजी वाहनधारकांची गैरसोय दूर केल्याबद्दल विनायक गोळे व पल्लवी गोळे या दाम्पंत्याचा सत्कार करण्यात आला. संतोष शांताराम गायकवाड यांचा आदर्श शिक्षक म्हणून, तर लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे व त्यांचे सहकारी यांचा तसेच केएमजी विभागातील ग्रामस्थ किरण लाड यांची रायगड जनोदयचे उपसंपादक झाल्याबद्दल, तसेच प्रसिध्द बासरीवादक वंडरबाॅय मेघ निलेश पोटे, तसेच सातासमुद्रापार जहाजावर काम करणारी साक्षी दिपक वाडेकर, उद्योजक संतोष गायकवाड व दिनेश घाग यांनी नागोठण्यात माथाडी कामगार संघटना सुरु करून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल, सन्मित्र मित्रमंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यांचे अध्यक्ष व सर्व कमिटीचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रियदर्शनी चालक मालक संस्थेचे चेअरमन सिराज पानसरे व संचालक मंडळ, पत्रकार झाल्याबद्दल नारायण म्हात्रे तसेच पुंडलिक ताडकर हे रिलायन्स कंपनीमधून चांगली सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार त्यांचा करण्यात आला. मेहबुब अत्तार व नगमा अत्तार या दाम्पत्यांचा नियमित कर्जदार म्हणून सत्कार करण्यात आला तर कांचन घाग उत्कृष्ट पिग्मी कर्मचारी तर नागोठण्यातील महिला चार्टर्ड अकाउंट म्हणून पायल राजेंद्र मोदी हिचा सत्कार तसेच नावाजलेले सर्पमित्र किशोर शिर्के यांचाही सत्कार मान्यवर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.

केएमजी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कोएसो बापूसाहेब देशपांडे विद्यासंकूल, होली एंजल, भारतीय एज्युकेशन सोसायटी व उर्दू हायस्कूल या शाळांमधील प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा सत्कार यावेळी करण्यात आला. या वार्षिक सभेमध्ये पतसंस्थेचे मार्गदर्शक, माजी रायगड जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पोमण तसेच भाजपचे महिला उपाध्यक्ष श्रेया कुंटे, पुंडलिक ताडकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

श्री अष्टविनायक पतसंस्थेच्या २५व्या वार्षिक अहवालाचे वाचन व मनोगत तसेच नफा तोटा पत्रकाचे वाचन संस्थेचे सचिव प्रफुल्ल नागोठणेकर यांनी केले तर, अंदाज पत्रकाचे वाचन संस्थेचे उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले. वार्षिक सभेची प्रस्तावना व अंतर्गत लेखा परिक्षण अहवालाचे वाचन, शासकीय लेखा परीक्षण अहवालाचे वाचन संस्थेचे संचालक रोहिदास हातनोलकर यांनी केले. मागील वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन पतसंस्थेच्या व्यवस्थापिका शैला घासे यांनी केले. २५व्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे खजिनदार रतन हेंडे, संचालक दिलीप धाडसे, रविंद्र वाजे, दिनेश घाग, दिलीप सोनावणे, संचालिका श्वेता चौलकर, वृशाली जोगत, संध्या सांगले, स्वीकृत संचालक राजेंद्र गायकर, राकेश चितळकर, तज्ञ संचालक प्रकाश जाधव, तडजोड‌ कमिटीचे अध्यक्ष सखाराम ताडकर, सदस्य संतोष चितळकर, शेखर जाधव, पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट, सभासद, मान्यवर, केएमजी विभागातील ग्रामस्थ, नागोठण्यातील महिला मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, सत्कार मुर्ती आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन संस्थेचे संचालक रोहिदास हातनोलकर यांनी केले. अशाप्रकारे पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. महेंद्र धामणे यांची एकमताने निवडीची घोषणा पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांनी केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!