अनंत नारंगीकर
उरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील जागूत श्री महागणपती मंदिरात सोमवारी (दि. २) संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी मंदिरात आपल्या लाडक्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावाला निसर्गाच वरदान लाभले आहे. अशा निसर्गरम्य गावात इच्छापुर्ती करणारे श्री महागणपती देवस्थानचे पुरातन मंदिर आहे. या गणरायाच्या मंदिरामूळे आणि ब्रिटीश सत्ते विरोधात लढल्या गेलेल्या १९३० सालच्या जंगल सत्याग्रहामूळे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामूळे दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग, उरण परिसरातील अनेक भक्तगण आपल्या कुटुंबासह चिरनेर गावाला भेट देऊन श्री चरणी नतमस्तक होतात.
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती या सुट्टीच्या (सोमवार, दि. २ ऑक्टो.) दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने सकाळी ठिक ५ वाजल्यापासून हजारो भाविकांनी आपल्या कुटुंबासह लाडक्या श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावात गर्दी केली होती. मात्र तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येणाऱ्या गावातील खड्डेयुक्त रस्ते, दुर्गंधीयुक्त अरूंद रस्त्याचा सामना हा दुरुन येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागल्याने अनेक भक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.