• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन अडलं? अजितदादा गटाला शिंदेंचा विरोध

ByEditor

Oct 4, 2023

अजित पवार गटाला दहा जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं?

मुंबई : सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाला दहा जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं देण्याचं ठरलं आहे. त्यानुसार दादा गटाकडून त्यापैकी सात जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांसाठी नावं निश्चितही करण्यात आली आहेत. परंतु तीन जिल्ह्यांवरुन दादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. एक दोन दिवसात पालकमंत्र्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही पुण्याची धुरा अजितदादांकडे होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ती जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर दोन ‘दादां’मध्ये पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन धुसफूस चालू असल्याचंही बोललं जातं. परंतु आता पुण्याचं पालकमंत्रिपद चंद्रकांतदादांकडून काढून घेऊन अजितदादांकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजितदादांच्या वाट्याला आलेल्या दहापैकी तीन जिल्ह्यांबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. रायगडसह सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवर अजित पवारांनी दावा केला आहे. मात्र त्यास शिंदे गटाचा विरोध आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची यादी जाहीर होण्याची विलंब वाढतच आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल लागल्यापासूनच भरत गोगावले आपल्याला रायगडचे पालकमंत्रीपद मिळणारच, हे ठामपणे सांगत आले आहेत. मात्र, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांचे नावही ऐनवेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आले आहे. अजित पवार गटाच्या दबावामुळे रायगडचे पालकमंत्रीपद तटकरेंनाच मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे. आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करु, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!