राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप युतीची शक्यता : शिवसेना (ऊबाठा), काँग्रेस आघाडी निश्चित
शामकांत नेरपगार
नागोठणे : मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नागोठणे ग्रामपंचायती निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होत असून आचार संहिता लागू झाली असल्याची बातमी दै. रायगड जनोदयकडून प्रसिद्ध झाल्यानंतर ही बातमी नागोठणे शहरांत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागोठण्यातील नाक्यानाक्यावर निवडणूक संदर्भात चर्चा होत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे नागोठण्यात ‘महिला राज’ येणार असून नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना काँग्रेस आघाडी निश्चित समजली जात आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता असून मागील निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी शिवसेनेकडून डॉ. मिलिंद धात्रक, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब टके व भाजपकडून विलास चौलकर हे निवडणूक रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेचे डॉ. मिलिंद धात्रक हे जनतेतुन निवडून आलेले पहिले सरपंच ठरले. आता सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे पुढील नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतुन कोणत्या पक्षाची महिला सरपंच म्हणून निवडून येते याची उत्सुकता नागोठणेकर नागरिकांमध्ये लागली असून सर्वच पक्ष तयारीला लागलेले असल्याचे दिसून येत आहेत. नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेकडून उपविभाग प्रमुख संजय महाडिक यांची पत्नी, माजी उपसरपंच सुप्रिया महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांची पत्नी मनिषा टके, माजी सरपंच विलास चौलकर यांची पत्नी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्वेता चौलकर व रोहा पं. स. चे माजी सदस्य डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या रोहा ता. उपाध्यक्षा रिचा धात्रक तसेच भाजपकडून जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या नावाची चर्चा असून येत्या काही दिवसातच सर्व चित्र स्पष्ट होईल. नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची महिला सरपंच होईल हे ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यावरच कळणार असून नागोठणेकरांना मात्र निवडणूक जाहीर होताच उत्सुकता लागली आहे.
| निवडणूक जाहीर होताच हवशे नवशे लागले कामाला! ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच हवशे, नवशे, गवशे असे सारेच कामाला लागलेले आहेत. परंतू कोणत्या पात्रतेचा उमेदवार ग्रामपंचायतीत असावा, याबाबत मात्र मतदारांच्या काही ठोस अपेक्षा आहेत. ठेकेदार झालेल्या नेतृत्वांना तिलांजली देऊन मतदारांना विकासाभिमुख दृष्टीकोन असलेल्या चारीत्र्यसंपन्न उमेदवारांचीच अपेक्षा लागलेली आहे. सत्ताधारी सदस्यच जर ठेकेदार झाले तर नुकसान होते. गावाचा विकास खुंटला तर गाव 20 ते 25 वर्ष मागेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी काही ज्येष्ठांनी प्रयत्न केले होते मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने हि निवडणूक चुरशीची होईल यात तिळमात्र शंका नाही. |
