तडकफडकी कामावरून काढले, पत्नीसह उपोषणाला बसणार
किरण लाड
नागोठणे : येथील वरवठणे गावातील दोन्ही पायांनी दिव्यांग नारायण वामन म्हात्रे यांना रिलायन्स कंपनीने कामावरुन तडकाफडकी काढले आहे. जोपर्यंत कंपनी कामावर घेत नाही तो पर्यंत रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेट समोर पत्नीसह आमरण उपोषणाला बसणार असे निवेदन म्हात्रे यांनी मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिले आहे.
दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी नारायण म्हात्रे यांनी मा. जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मी सन 1994 पासून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करित आहे. रिलायन्स कंपनीमध्ये काम करणारी रोटास्टाट या कंत्राटी कंपनीत गेली पाच वर्ष सुपरवायझर या पदावर काम करित असताना या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर माझा तसेच माझी पत्नी, दोन शिक्षण घेणारी मुले यांचा कौटुंबिक खर्च व शैक्षणिक खर्च भागत आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी कोणीतरी माझ्या मोबाईलची छेडछाड करुन रिलायन्सच्या निता अंबानी यांच्या फॅन अकाउंटवर (जे खरे अकाउंट नाही) कमेंट केली. याचा माझ्याशी काडीमात्र सबंध नसताना, दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी संध्या. 4.30 वाजता रिलायन्सचे गोडबोले यांनी मला अपमानास्पद शब्द वापरुन मटेरियल गेटवरुन बाहेर काढले व माझा गेटपास घेऊन मला कामावरुन काढले आहे. माझ्या उपजिविकेचे साधन बंद झाले असून बेकारीचे जीवन जगत असून मी कर्जबाजारी झालो आहे. माझ्यावर झालेल्या आरोपाची चौकशी व्हावी, यासाठी नागोठणे पोलिस स्टेशनकडे अर्ज दिलेला आहे. रिलायन्स व्यवस्थापन माझ्यासारख्या दिव्यांग बांधवावर अन्याय करीत आहे. माझे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकतीच माझ्या पत्नीची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. तरी मला दिव्यांगाला न्याय द्यावा व मला पूर्ववत कामावर घ्यावे. तसे न झाल्यास मी व माझी पत्नी हर्षाली दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेट समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे निवेदन दिव्यांग नारायण म्हात्रे यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड व संबंधित प्रशासनास दिले आहे.
कोणतीही शहानिशा न करता रिलायन्स कंपनीने दिव्यांग नारायण म्हात्रे यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याने म्हात्रे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे अपंगांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपंग कल्याण मंत्रालयाची स्थापना केली आहे तर दुसरीकडे नारायण म्हात्रे सारख्या दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन म्हात्रे यांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे तसे न झाल्यास उपोषणाचे हत्यार उपसण्याची वेळ नारायण म्हात्रे यांच्यावर आली आहे.
