क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड प्रीमियर लिग तर्फे आयोजित केलेल्या एकोणीस वर्षाखालील वूमेन्स चॅलेंजर्स लेदर बॉल टी-२० क्रिकेट लिग स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स पुणे संघांनी रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे संघावर २७ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला. उरण येथील जेएनपीटीच्या क्रिकेट मैदानावर दि. ९ ते ११ जून रोजी रायगड प्रीमियर लिग तर्फे वूमेन्स चॅलेंजर्स टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील मुलींच्या दोन संघांसह रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे व वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब पुणे अश्या चार संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

साखळी स्वरूपात खेळल्या गेलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब पुणे व रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे संघामध्ये झाला. त्यामध्ये वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब पुणे संघाने रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे संघावर २७ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पुणे संघांनी २० षटकांमध्ये ६ गडी गमावत १२८ धावा फलकावर लावल्या. सलामीला आलेल्या प्रणया पोहेकर व तेजस पोळ हिने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीत अदिती वाघमारे हिने १८ तर उत्कर्षा कदम हिने बहुमूल्य २३ धावांचे योगदान दिले. रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमीकडून मानसी केदार हिने ३ तर चेतना बिस्त हिने १ फलंदाज बाद केला.

प्रतिउत्तरात ठाणे संघांनी १८.४ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १०१ धावा काढल्या. त्यामध्ये अक्षी गुरव हिने सर्वाधिक ३९ तर रेंनी फर्नांडीस हिने १४ धावांचे योगदान दिले. वॉरियर्स स्पोर्ट्स संघाकडून आर्या घोलप व अदिती वाघमारे हिने प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले. वोररियर्स स्पोर्ट्स पुणे संघांनी सामना २७ धावांनी जिंकला. अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ दि मॅच म्हणून वॉरियर्स स्पोर्ट्स संघाची अदिती वाघमारे तर फायटर ऑफ दि मॅच म्हणून रायजिंग प्लयेर्स क्रिकेट अकॅडमी संघाची अक्षी गुरव हिला गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून आर्या घोलप, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या तेजस पोळ तर प्लेयर ऑफ दि सिरीज म्हणुन चेतना बिस्त हिला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच अपर्णा पाटील, मनोज पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र म्हात्रे, अरुण केंडे, आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, जेएनपीटीचे सेझ मॅनेजर भरत म्हात्रे, योगेश ठाकूर, संदीप वार्गे, आरपीएल सदस्य संदीप जोशी, रोहित काळे, प्रीतम पाटील, ऍड. पंकज पंडित, वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब संघाचे प्रशिक्षक स्वप्नील मोडक, रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक आशिष मोरांकर ह्यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात प्रथमच मुलींसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील होतकरू वूमेन्स क्रिकेटर्ससाठी एक मोठं व्यासपीठ रायगड प्रीमियर लिगच्या माध्यमातून निर्माण करणार असल्याचे आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील ह्यांनी यावेळी सांगितले.