गणेश पवार
कर्जत : खालापूर येथून जनावरे घेवून नेरळ बदलापूर दिशेने कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांना घेवुन जाणारा टेम्पो नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर टेम्पो चालक स्वप्नील सुरेश गायकवाड यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर रात्री उशिरापर्यंत नेरळ पोलीस ठाणे येथे गोरक्षक एकत्र जमले होते. नेरळ पोलिसांच्या या कामगिरीमुळे तीन गोवंशीय जनावरांचे प्राण वाचल्याने पोलीसांचे कौतुक होत आहे.
खालापूर तालुक्यातील डोणवत नारंगी गावात राहणारा स्वप्नील सुरेश गायकवाड हा आपल्या जवळील पिकअप टेंम्पो क्रमांक एमएच ०६ बीजी ४९७४ या वाहनातून गोवंशीय जातीची तीन जनावरे कत्तलीसाठी घेवून निघाला होता. दरम्यान, गुरुवार दि. ५ ऑक्टोबर रोजी कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मंमदापूर फाटा येथील हॉटेल टीवाले येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आला असता नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल पाटील यांनी टेम्पोला अडवले असता, या टेंम्पोमध्ये तीन गोवंशीय जनावरे क्रुरतेने भरलेली पाटील यांना आढळून आली. तर उपस्थित काही गोरक्षक तरुणांनी येथे गर्दी केल्याने पोलीस हवलदार अमोल पाटील यांनी कार्यतत्परता दाखवत चालकाला वाहनासोबत नेरळ पोलीस ठाण्यात आणले. अधिकारी वर्गाने चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आल्याने व सदर माहिती नेरळमध्ये पसरताच नेरळ शहरातील गोरक्षक प्रेमींनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली.
यावेळी चौकशी अंती पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याने गोरक्षक निघून गेले. तर तीन गोवंशीय जातीची जनावरे व पिकअप टेंम्पो असा ऐकून अडीच लाखांचा मुद्देमाल नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून स्वप्नील सुरेश गायकवाड याच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(घ)(ड)(ज) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात आणखी एक आरोपी असल्याचे व त्याचे नाव, ठिकाण सापडले नसल्याची माहिती ही नेरळ पोलिसांकडून देण्यात आली आहे, सदर गुन्ह्याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक लिंगप्पा सरगर हे करीत आहेत.
एकूणच नेरळ परिसरातील काही गावातील मागील दिवसांपासून शेतकऱ्यांची जनावरे ही चोरीला जात असल्यामुळे ही जनावरे तीच आहेत का? त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. टेंम्पोत क्रूरतेने भरून आणलेली ही जनावरे नक्की कोणाची व कुठे कत्तलीसाठी नेण्यात येत होती या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे.
