घनःश्याम कडू
उरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होताना दिसत आहे. हा विकास होत असताना जमिनीला ही तेवढाच भाव आला आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आपल्या काही दिवसांच्या सुखासाठी जीवापाड जपलेली जमीन विकू नये असा मौलिक सल्ला सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील यांनी कामगार नेते संतोष पवार यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जेएनपीए कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले, सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब, अशिक्षित, अज्ञानी ठेवून राज्यकर्ते राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा हा न भिणारे जीवन आहे. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते म्हणूनच माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजासाठी जगले पाहिजे, निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले पाहिजे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे हक्कासाठी जनशक्ती व अहिंसेच्या मार्गाने जाण्याचे आवाहनही कोळसे पाटील यांनी यावेळी केले.
या सत्कार सोहळ्यास माजी आमदार मनोहर भोईर, अॅड. सुरेश ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, कामगार नेते अनिल जाधव, शाम कुलकर्णी सर , जीवन गावंड, महेश म्हात्रे आदी मान्यवरांनी यावेळी संतोष पवार यांच्या कार्याची माहिती दिली.
त्याआधी नियोजीत लोकनेते दि. बा. पाटील इंजिनियरींग कॉलेज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. येथील तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उरण नगरपालिका कर्मचार्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार नेते संतोष पवार यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी मोबाईल व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. आपल्यावर झालेल्या शुभेच्छांनी आपण भारावून गेलो असून आपले सुरू असलेले काम यापुढेही असेच सुरू राहील असे संतोष पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
