मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट आग्रही होता. पण या वादावर आता पडदा पडला असल्याची चर्चा आहे. यासाठी शिंदे गटाने माघार घेतली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंबधीची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार? हा वाद आता संपल्याच्या चर्चा आहेत. यंदाही दसरा मेळाव्यासाठी आपल्याला मैदान मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा पेच निर्माण झाला होता. पण, आता हा प्रश्न सुटला आहे.
शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. यासंबधी बोलताना उद्धव ठाकरे यांना आपण त्यांना कधीच रोखलेलं नाही. आपला मेळावा (शिंदे गटाचा) क्रॉस किंवा ऑव्हल मैदानावर होणार असल्याचं दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणालेत दीपक केसरकर ?
आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
