संतोष रांजणकर
मुरूड : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली असून दरवर्षीप्रमाणे यंदा अलिबाग-मुरुड रस्त्यावर बोर्ली नाक्यावर गटारांची साफसफाई करण्यात न आल्याने रस्त्यावर पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभागाच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

रामवाडीपासून बोर्ली नाक्यावर गटारांची कचरा त्याच बरोबर प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, घाणीमुळे पार दुरावस्था झालेली आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवासी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोर्ली नाक्यावरील गटारांची साफसफाई न झाल्यास याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी पावसाळ्यात येथे पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार घडले आहेत. याकरिता संबंधित बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून बोर्ली नाक्यावरील गटारांची तातडीने साफसफाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.