आगीत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अनंत नारंगीकर
उरण : जेएनपीए बंदरातील सेझ प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुदैवी घटना बुधवारी (दि. ११) सकाळी ठिक १०.४५ च्या सुमारास घडली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीची तीव्रता एवढी होती की कंपनीतील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेएनपीए बंदर परिसरातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीत सेझ प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पाच वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, जेएनपीए बंदरातील महत्त्वाच्या सेझ प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुदैवी घटना बुधवारी (दि. ११) सकाळी ठिक १०.४५ च्या सुमारास घडली आहे. सदरची आग कशामुळे लागली त्याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की धुराचे लोट उंच हवेत पसरत होते. या आगीत जीवीतहानी झाली नाही. मात्र कंपनीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जेएनपीए, सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली आहे.

