सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्तावले तर ठेकेदार मस्तावले!
मिलिंद माने
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुका हा ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या तालुक्यात पाच राज्यमार्ग व तेरा जिल्हा मार्ग असून पावसाळी रस्त्याच्या कडेला सर्वच रस्त्यांवर वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका वाढला असून रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत ज्या खाजगी एजन्सीमार्फत काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे त्यांच्यावर कोणताही अंकुश नसल्याने ठेकेदार मस्तावलेत तर अधिकारी सुस्तावल्याचा प्रकार महाड तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

महाड तालुका हा ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा ऐतिहासिक किल्ला रायगड, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेले चवदार तळे, त्याचप्रमाणे ऐतिहासिक गांधारपाले लेणी, सव येथील गरम पाण्याचे कुंड, समर्थ रामदासांचे शिवथरघळ, त्याचप्रमाणे पुण्यातून दापोली, रत्नागिरी तसेच अलिबाग, श्रीवर्धन या ठिकाणी हजारो पर्यटक व शिवभक्त तसेच लाखो प्रवासी खाजगी तसेच एसटी मार्फत या रस्त्यावरून दररोज प्रवास करतात.

महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे महाड तालुक्यातील पाच राज्यमार्ग तर तेरा जिल्हा मार्ग आहेत. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असल्याने अवघड वळणाच्या ठिकाणी समोरून येणारी गाडी दुसऱ्या वाहन चालकाला दिसत नसल्याने रस्त्यांवर यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे असणाऱ्या पाच राज्यमार्ग व तेरा जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा ठरणारी धोकादायक झाडे, त्याचप्रमाणे पावसाळ्यात येणारा डोंगर कपाऱ्यातून ओसरा व त्यामुळे रस्त्यावर होणारी माती व रस्त्याच्या आजूबाजूला पावसाळी वाढलेले गवत काढण्याचे काम पूर्वी मैल कामगारांकडून केले जायचे. मात्र, आता राज्य शासनाने मैल कामगारांची भरती बंद केल्याने अनेक रस्त्यांवर मैल कामगार ही प्रथा संपुष्टात आली आहे. परिणामी या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग खाजगी एजन्सीमार्फत करार पद्धतीने करून घेते.

महाड तालुक्यातील असणारे पाच राज्य मार्ग व त्यांची लांबी;
१) बिरवाडी वाळण सांडोशी रस्ता राज्यमार्ग क्रमांक 102. एकूण लांबी 17 किलोमीटर तर दरडग्रस्त क्षेत्राची लांबी 4 किलोमीटर
२) दहिवड वाकी शेवते रस्ता राज्यमार्ग क्रमांक 106. हा रस्ता 4 किलोमीटर लांबीचा असून चारही किलोमीटर अंतर हे दरडग्रस्त प्रमाण क्षेत्रात येते.
३) पाचाड छत्री निजामपूर रस्ता राज्यमार्ग क्रमांक 95. याची लांबी 4/500. यापैकी एक किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र म्हणून संबोधले जाते.
४) इंदापूर निजामपूर पाचाड रायगड महाड विसापूर दापोली रस्ता राज्यमार्ग क्रमांक 97. याची लांबी 27 किलोमीटर असून त्यातील तीन किलोमीटर हे दरड प्रवण क्षेत्र म्हणून संबोधले जाते.
५) नागाव-करंजाडी-विन्हेरे-तुळशी खिंड रस्ता राज्यमार्ग क्रमांक 172. याची लांबी 14 किमी असून तीन किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रांमध्ये समाविष्ट होते
महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे १३ जिल्हा मार्ग असून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती देखील खाजगी ठेकेदारामार्फतच केली जाते. त्यांची नावे व लांबी पुढील प्रमाणे;
(१) भावे किये पदाजीरायाचा कोंड प्रथम जिल्हा मार्ग 94. या रस्त्याची लांबी 12 किलोमीटर आतून दोन किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रामध्ये संबोधले जाते.
(२) ढालकाटी निगडे रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 65. या रस्त्याची लांबी 23 किलोमीटर असून 4/50 क्षेत्र दरड प्रवण क्षेत्र म्हणून संबोधले जाते.
(३) भोराव संवाद धारवली रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 64. या रस्त्याची लांबी 13/ 500 आहे.
(४) तुढील भेलोशी मंडणगड रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 66. या रस्त्याची लांबी6/800. असून1/80. किलोमीटर क्षेत्र दरड प्रवण म्हणून संबोधले जाते.
(५) मोहप्रे नाते नांदगाव रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 92. या रस्त्याची लांबी दहा किलोमीटर आहे.
(६) बिरवाडी कांबळे भोगाव रोड दहिवड ते राज्य मार्ग 102. प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 93 या रस्त्याची लांबी 18 किलोमीटर आहे.
(७) वीर नाते ते महाड रायगड रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 97. या रस्त्याची लांबी 14 किलोमीटर आहे.
(८) लाडवली मांगरून अडराई शेवते रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 95. या रस्त्याची लांबी 37 किलोमीटर असून दोन किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र आहे.
(९) वाकी बुद्रुक पडवळवाडी रानवडी आंबे शिवतर रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 91. या रस्त्याची लांबी 11 किलोमीटर असून अडीच किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्र म्हणून संबोधले जाते.
(१०). बारसगाव शिवथर रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 70. या रस्त्याची लांबी 15/40 किलोमीटर आहे.
(११) पोलादपूर काटे-तळी नागाव रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 96. या रस्त्याची लांबी पाच किलोमीटर आहे.
(१२) पोलादपूर काटे-तळी नागाव रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 68. या रस्त्याची लांबी अडीच किलोमीटर आहे.
(१३) नरवण खुटील रस्ता प्रथम जिल्हा मार्ग क्रमांक 67. या रस्त्याची लांबी 6 किमी असून दोन किलोमीटर क्षेत्र हे दरड प्रवण म्हणून समाविष्ट आहे.
महाड तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते. तसेच काही वेळेला मोठ्या प्रमाणावर ढगफुटी देखील होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाडच्या अख्यतारीत येणाऱ्या पाच राज्यमार्ग व तेरा जिल्हा मार्गांपैकी अनेक रस्ते हे दुर्गम व डोंगराळ भागातून गेलेले आहेत. या सर्वच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले असून ते वाढलेले गवत काढण्याचे काम ज्या खाजगी एजन्सी धारकांना सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत देण्यात आले आहे त्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ठेकेदारांनी या रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत काढले आहे. तर काही एजन्सी धारकांनी या रस्त्यावरील शाखा अभियंता यांना हाताशी धरून कामे न करता बिले काढण्याचे काम केल्याचे पाहण्यास मिळत आहे.
महाड सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागाकडे असणाऱ्या पाच राज्य मार्ग व 13 जिल्हा मार्ग या रस्त्यांवर सद्यस्थितीत सात ते आठ फुटापर्यंत गवताचे डोंगर उभे राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे समोरून येणारे वाहन दुसऱ्या वाहन चालकाला दिसत नाही. त्यातच या रस्त्यावर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक देखील गवताच्या वेटोळ्यांनी व जंगली झुडपांनी पूर्णपणे व्यापून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर वाढलेल्या गवतांची छाटणी करण्याचे काम ज्या खाजगी एजन्सी धारकांकडे आहे त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी त्या त्या विभागातील शाखा अभियंत्यांची आहे. मात्र, हे शाखा अभियंते महाड येथील कार्यालयात बसूनच कागदी घोडे नाचून संबंधित ठेकेदारांना केलेल्या कामाची खोटी बिलं करण्याचे काम जोमाने करत आहेत. याबाबत महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपअभियंता गणगणे यांच्याकडे माणगाव येथील उपविभागाचा अधिकृत पदभार आहे. मात्र, महाड येथे त्यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे त्यांना महाडचा पदभार घेतल्यानंतर राज्य मार्गांवरील रस्त्यांची ना जिल्हा मार्गावरील रस्त्यांची पाहणी केली. केवळ माणगाव येथून महाडला यायचे व महाडवरून माणगावला जायचे एवढे सोपस्कार पार पाडण्याचे उद्योग गणगणे यांच्याकडून होत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांना पडला आहे.
महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांची कथा तर फार सुरसच आहे. हे कधीच कार्यालयात उपस्थित नसतात, कोकण भवन व मंत्रालय येथे कार्यालयीन कामासाठी गेल्याचे कागदोपत्री डायरी भरण्याचे काम होत आहे. जर त्यांचा या कार्यालयावर अंकुश असता तर महाड तालुक्यातील पाच जिल्हा मार्ग व 13 राज्य मार्गांवर रस्त्याच्या कडेला एवढ्या गवताची उंची वाढलीच नसती. जशी अवस्था महाड तालुक्यातील रस्त्यांची झाली आहे तशीच परिस्थिती पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यात असणाऱ्या सर्व राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. याला कार्यकारी अभियंता महेश नामदे यांचा अकार्यक्षम कारभार जबाबदार असल्याची चर्चा महाड सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील प्रभारी उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावरून श्रीकांत गणगणे यांना रस्त्यावर वाढलेल्या गवतामुळे अपघात झाल्यास कोणतेही सोयरसुतक नसल्याचे स्पष्टपणे दिसते.
