सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडी येथील ४० वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदरील घटना रविवार, दि. ८ ॲक्टोबर २०२३ रोजी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची खबर अल्पेश राजाराम खडतर (वय -२२) रा. तासगाव आदिवासीवाडी ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात रविवार, दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल करण्यात आली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत राजाराम धुलाजी जाधव (वय-४०) रा. तासगाव आदिवासीवाडी ता. माणगाव याने रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने त्याला अधिक औषधोपचाराकरीता अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्यावर औषधोपचार चालू असताना त्याची प्रकृती अधिक गंभीर होऊन ते मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ४७/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. जाधव अलिबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.
