अभय पाटील
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश उर्फ हरिओम चोगले, माजी उपसरपंच किशोर भोईनकर, श्रीवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष महादेव चोगले व इतर कार्यकर्त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पक्षामध्ये स्वागत केले.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्यांची गर्दी सध्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज रविवार, १५ ऑक्टोबर घटस्थापनेच्या दिवशी तसेच विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भरडखोल ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच भारतीय जनता पक्षाचे श्रीवर्धन संपर्कप्रमुख दिनेश उर्फ हरिओम चोगले, माजी उपसरपंच किशोर भोईनकर, श्रीवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष महादेव चोगले व इतर यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश गीताबाग सुतारवाडी येथे संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी यांचे विकासकामांच्या बाबतीत श्रीवर्धनकडे नेहमीच दुर्लक्ष होत असून आम्ही खासदार सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर व ते करीत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महमद मेमन, दिवेआगर सरपंच उदय बापट, माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे यांच्या सहकार्याने प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्ते दिनेश उर्फ हरिओम चोगले यांनी सांगितले.
भरडखोल येथील दिनेश चोगले, किशोर भोईनकर व इतर यांच्या प्रवेशाने श्रीवर्धन तालुक्यामध्ये ताकद मिळाल्याचे बोलले जात असून बोर्ली पंचतन जिल्हा परिषद विभागामध्ये देखील याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे म्हटले जात आहे. या पक्ष प्रवेशावेळी महमद मेमन, शामकांत भोकरे, उदय बापट, भरडखोल कोळी समाजाचे नेते रामचंद्र वाघे, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य संघटक नंदू पाटील व इतर उपस्थित होते.
