• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बंदरांची राजधानी देशात पिछाडीवर; मुंबईतील बंदरांना गुजरात, ओडिशाने टाकले मागे

ByEditor

Oct 15, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
देशातील एकूण आयाती पैकी ७० टक्के आयात समुद्रातून होते. त्यासाठी देशाच्या ७,५०० किमी लांबीच्या किनारपट्ट्यांवर २०० लहान-मोठी बंदरे असून त्यातील ७० बंदरे कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सन २०२२-२३मध्ये २,६०० दशलक्ष टन मालवाहतूक (कार्गो) हाताळणी झाली. मात्र एकेकाळी बंदरांची राजधानी असलेली मुंबईतील बंदरे या कार्गो हाताळणीत अन्य बंदरांच्या तुलनेत पिछाडीवर गेल्याचे ‘जीएमआयसी’ निमित्ताने तयार झालेल्या ‘नेव्हिगेटिंग एक्सलन्स : इंडियाज्‌ मेरिटाइम सेक्टर’ (जलवाहतूक उत्कृष्टता : भारताचे सागरी क्षेत्र) या अहवालात समोर आले आहे.

पश्चिम किनाऱ्यावरील अत्यधिक महत्त्वाचे बंदर म्हणून जवळपास २०० वर्षे आधीपासून मुंबईतील बंदरांवरून व्यापाराला सुरुवात झाली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील विविध धक्के हे कापसाच्या आयात-निर्यातीचे प्रमुख केंद्र होते. त्यातूनच पुढे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हे स्वातंत्र्यपूर्व काळात उभे राहिले. आता या बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे मुंबई बंदर प्राधिकरण झाले आहे, मात्र देशाच्या एकूण उलाढालीत ते मागे पडले आहे.

मुंबई बंदर प्राधिकरणांतर्गत एकूण ६३ जहाजे उभी करण्याचा तळ व सात धक्के मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर आहेत. या सातही धक्क्यांच्या माध्यमातून मार्च अखेरीस ६६ दशलक्ष टन कार्गोची हाताळणी झाली. हा आकडा त्याआधीच्या वर्षी ६२ दशलक्ष टनाच्या घरात होता. त्यात वाढ झाली असली तरीही देशातील अन्य बंदरांची वाढ अधिक आहे. त्यामुळेच या अहवालानुसार, एकूण कार्गो हाताळणीत मुंबई बंदर प्राधिकरण पाचव्या स्थानी फेकले गेले आहे.

मुंबई बंदर प्राधिकरणाला विस्तारासाठी फार वाव नसल्याने १९८९मध्ये नवी मुंबईच्या न्हावाशेवा येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सुरू झाले. आता हे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) म्हणून ओळखले जात आहे. या बंदराचा हळूहळू विस्तार करण्यात आला. आज त्या ठिकाणी चार मोठे कंटेनर डेपो, अवजड जहाजे उभी राहू शकतील अशा तीन मोठ्या जेट्टी व १००हून अधिक जहाजे उभी करण्याचा तळ आहे. विशेष आर्थिक क्षेत्राचा देखील त्यात समावेश आहे. यामुळे मागील वर्षीपर्यंत जेएनपीए कार्गो हाताळणीत देशात अग्रस्थानी होते. २०२२-२३मध्ये या बंदरातून ७५.९४ दशलक्ष टन कार्गो हाताळणी झाली. मात्र त्याचवर्षी गुजरातमधील मुंद्रा व कांडला या बंदरांसह ओडिशातील पारादीप बंदराने जेएनपीएला मागे टाकले आहे. या तिन्ही बंदरांतील कार्गो हाताळणी १०० दशलक्ष टनांहून अधिक असून त्यांनी मुंबईतील या बंदरांना मागे टाकले आहे.

कार्गो हाताळणीनुसार देशातील अग्रणी बंदर (दशलक्ष टन)

बंदरकार्गो हाताळणी
मुंद्रा (गुजरात)१५०
कांडला (गुजरात)
(दिनदयाल उपाध्याय बंदर)
१३७
पारदीप (ओडिशा)१३५
जेएनपीए७६
मुंबई बंदर प्राधिकरण६६

मुंद्रा व जेएनपीए जगात १००मध्ये

मुंद्रा व जेएनपीए या दोन बंदरांनी सर्वाधिक कंटेनर हाताळणीत जगात पहिल्या १००मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामध्ये मुंद्रा २७व्या व जेएनपीए २८व्या स्थानी असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!