अमोल पेणकर
रोहे : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज रविवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले आणि महाराजांच्या नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
रोहे शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे.
“हे धाविर महाराजा समस्त रोहवासीय ग्रामस्थांनी श्रध्देने आणि पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे, या उत्सवामध्ये आमच्या हातुन चांगली सेवा होईल…काही चुका सुध्दा होतील, पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे…तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव” असे देवस्थानचे पुजारी वालेकर यांनी श्री धाविर देवस्थानचे विश्वस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणी शेकडो धाविरभक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गाऱ्हाणे मांडले आणि अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी गोंधळयांची आरती, विविध वाद्य आणि घंटानादाने आसमंत दुमदुमून टाकणाऱ्यां मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली.
यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समीर सकपाळ, महेश सरदार, संदीप सरफळे, अमित उकडे, शैलेश रावकर, निलेश शिर्के, राजेश काफरे, रवींद्र चाळके, सूर्यकांत कोलाटकर, शैलेश कोळी, प्रकाश पाटणकर, दत्ता जगताप, दिलीप वडके, रमेश साळवी, भालचंद्र पवार आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार अनिल तटकरे आणि संदीप तटकरे यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाराजांचे दर्शन घेतले.
