मिलिंद माने
महाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी काम पूर्ण होत आले असून येत्या २० ऑक्टोबरपासून बहुचर्चित आंबेत पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चालवल्याचे माणगावचे उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे परंतु, ऑक्टोबर २०२१ मध्ये आंबेत पुलाची पाण्याखालून तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी पुलाचा भाग सुस्थितीत असल्याने पुलाच्यावरील भागाच्या दुरुस्तीचे काम चालू केले. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये हा पूल धोकादायक बनल्याने त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणात पुलाचा पाया क्रमांक पाच झुकल्याचे स्पष्ट झाले. आंबेत पुलाचा पिलर भरती व ओहोटीच्या वेळी दोन ते चार मीटरने हलत असल्याचे यांत्रिक साधनाद्वारे दिसून आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला व त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी २०२२ रोजी या पुलाच्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता आदी या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळेला पूल बंद असल्याने दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांची व प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी रो-रो सेवा सुरू करण्याचे निश्चित केले व आंबेत पुलाजवळून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूकडे रो-रो सेवा चालू करण्यात आली.
आंबेत पुलामुळे रायगड व रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात झाले होते. या पुलावरून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील असणाऱ्या गावांना आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. आंबेत पुलाच्या डागडुजीसाठी 14 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मात्र या पुलाचे काम करणाऱ्या टी अँड टी या कंपनीला अद्याप एकही रुपया शासनाकडून प्राप्त झाला नाही. केवळ अधिकारांच्या कौशल्यावर या पुलाच्या दुरुस्तीचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे.
आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून २० ऑक्टोबरपासून आंबेत पुलावरून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या वाहनांची पूर्वीसारखीच वाहतूक चालू होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माणगाव येथील उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आंबेत पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्याबाबत मी कार्यकारी अभियंता महेश नामदेव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो.
याबाबत कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आंबेत पुलाचे उर्वरित राहिलेले काम दोन ते तीन दिवसात पूर्ण करून २० तारखेपासून या पुलावरून वाहतूक चालू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
मनसेचा आमरण उपोषणाचा इशारा
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल दोन वर्षापासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हालअपेष्टा याला येथील सर्वसामान्य जनता कंटाळली असून अखेर येथील जनतेने महाप्रळ पंचक्रोशीच्या वतीने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या झेंड्याखाली आमरण उपोषणाचा इशारा मंडणगड तालुका मनसे उपाध्यक्ष मुस्तकीम कार-विनकर यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, २० तारखेपासून जर या पुलावरून सर्व वाहतूक पूर्ववत झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन आंदोलन करेल तसेच आमरण उपोषण चालू करेल असा इशारा त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल बांधण्याचे काम ३० डिसेंबर १९७२ ला चालू करण्यात येऊन १६ फेब्रुवारी १९७८ ला या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. या पुलाची लांबी ३७६ मीटर असून एकूण सात गाळे ४८.२२ मीटर ते ५५.८९ मीटर लांबीचे आहेत. तर या ठिकाणच्या रस्त्याची रुंदी ७.५० मीटर आहे. आंबेत खाडीची भरती ओहोटी व पाण्याचे क्षेत्र बघता समुद्रसपाटीपासून पुलाची उंची १.४३१ मीटर एवढ्या उंचीवर आहे तर आंबेत पुलाच्या ओहोटीची उंची २.५१९ मीटर तर पायापासून रस्त्यापर्यंतची अधिकतम उंची ३०.४९७ मीटरची आहे. आंबेत पुलाच्या पाण्याची खोली ११.८६ मीटर असून जलवाहतुकीसाठी ८.८४ मीटर उंच व ४०.५० मीटर रुंदीचे गाळे आहेत. आंबेत पुलाचा पाया ०.९१ मीटर जाडीचा व ४.५७ मीटर अंतर्गत व्यासाच्या सलोह कॉंक्रीटच्या खडकावर टेकलेल्या विहिरीमध्ये बनविण्यात आला होता. तसेच आंबेत पुलाचे खांब हे भरीव सलोह कॉंक्रीटच्या प्रकारात बनवले असून पुलाच्या वरती सलोह कॉंक्रीटच्या हॅमरेडवर ४१.५६ मीटर लांबीच्या दोन प्रिस्टर्ड तुळया आहेत. त्यावेळेला या पुलाच्या बांधणीचे संकल्पचित्र मेसर्स एस. बी. जोशी आणि कंपनी यांनी बनवले होते.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या बांधकामाचा खर्च १९७२ च्या काळात ६२ लक्ष ९० हजार एवढा होता. तर या पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्यासाठी पाच लाख १६ हजार रुपये एवढा अल्प खर्च आला होता. मात्र आता या पुलाच्या शंभर मीटरच्या भागाच्या दुरुस्तीसाठी केवळ १४ कोटीच्या वर रक्कम खर्च झाली असून या काळात प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात असलेल्या फेरीबोटीला किती पैसे खर्च झाले हे सांगण्यास मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तयार नाहीत. अंदाजे दोन वर्षाच्या काळात या प्रवासी फेरी बोटी वारी राज्य शासनाने किमान 20 कोटीच्या वर खर्च केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री, रायगडचे सुपुत्र बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पुण्याईमुळेच हा पूल झाला असून त्यावेळी सहा वर्षात पूर्ण झालेल्या पुलाला आज एवढ्या काळानंतर देखील कोणतीही मोठी हानी झालेली नाही. मात्र खाडीतील खाऱ्या पाण्यामुळे काळाप्रमाणे त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असताना केवळ शंभर मीटरसाठी राज्य सरकारने तीन वर्षाचा एवढा मोठा कालावधी घेतल्याने या तीन वर्षांमध्ये येथील जनतेचा दोन्ही जिल्ह्याशी संपर्क पूर्णपणे तुटल्याने येथील जनतेत बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
