कोलाड येथे पाणी जागर अभियान, प्रबोधनातून सायबाला आणली जाग, दे सायबा पाणी दे…
शशिकांत मोरे
धाटाव: बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय बळीराजाने सोमवारी जागतिक अन्नदिनी पाणी जागर अभियान आंदोलन केले. कोलाड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोरील मुंबई गोवा महामार्ग रस्त्यालगत केलेल्या पाणी जागर आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली बळीराजाने पाण्यासाठी पुन्हा एल्गार करत पाटबंधारे प्रशासन, लोकप्रतिनिधींना गंभीर ईशारा दिला. आता बळीराजाचा अंत पाहू नका, कालव्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वर्षे दिली,पण कालव्याची दुरुस्ती झाली नाही.दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदार,काही लोकप्रतिनिधी मालामाल झाले हा इतिहास आहे.आता आम्ही कोणतेच कारण खपवून घेणार नाही. कालव्याच्या पाण्याबाबत हयगय झाल्यास प्रसंगी आत्मदहन करू असा गर्भित ईशारा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला.

दरम्यान, शासन प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी पाणी जागर अभियान बळीराजा फाउंडेशनचे केले. दे सायबा पाणी दे…पाणी आणू या, पाणी आणू या…आम्ही गोंधळी गोंधळी बळीराजाचे गोंधळी…अशी गाण्यातून जनजागृती केली. तर बळीराजाने सोबत आणलेली भाकरी चटणी, ठेचा, कांद्याची चटणीमय शिदोरी अनेकांचे आकर्षण ठरले. बळीराजाने एकत्रित शिदोरी खाल्ली. हे आंदोलन सर्वकष चांगलेच प्रभावी ठरल्याचे बोलले जात आहे.
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजाने अनेक प्रभावी आंदोलन, मोर्चे काढले. १ मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण केले. सर्वच आंदोलनाची दखल घेत पाटबंधारे प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ केला. कालव्याला सोडलेले पाणी संभे गावापर्यंत आले. तरीही प्रशासनाला शेवटच्या निवी गावापर्यंत पाणी सोडण्यात यश आले नाही. त्यामुळे कालव्याची उर्वरीत दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करावी, सिंचन हंगामात कालव्याला पाणी सोडण्यात यावे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा फाउंडेशनने सोमवारी जागतिक अन्न दिनी पाणी जागर आंदोलन केले.
मध्यवर्ती तळावर कार्यालयापासून बाईक रॅली निघाली. कोलाड नाक्यावरून बैलगाडीतून जागर आंदोलनाला प्रारंभ झाला. पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, जय जवान जय किसान असा नारा सहभागी आंदोलनकर्त्यांनी दिला. बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, सागर भगत, सचिव ॲड. दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी, सल्लागार कृष्णा बामणे, राकेश बामूगडे, संतोष भोकटे, राम महाडिक, संकेत खेरटकर व असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. पाणी आणू या पाणी आणू या, दे सायबा पाणी दे…आम्ही गोंधळी गोंधळी पाण्याचे गोंधळी अशी प्रबोधनपर गाणी सादर केली. आंदोलनकर्त्यांची भेट घेवून राजकीय, सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी आम्ही सोबत आहोत असा विश्वास दिला.
आयोजित पाणी जागर आंदोलनातील बळीराजाची पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता अतुल आगवणे, उपविभागीय अभियंता एस. एस. महामुनी यांनी भेट घेऊन चर्चा केली. कालव्याची साफसफाई, दुरुस्ती करणे, तातडीने पूर्ण करा, सिंचन हंगामात शेवटच्या गावापर्यंत पाणी आलेच पाहिजे, कोणतीच कारणे चालणार नाहीत, हयगय खपवून घेतली जाणार नाही, अनेक कारणे अनेक वर्षे सहन केली. कालव्याच्या पाण्याबाबत हयगय दिसून आल्यास आम्ही सर्व शेतकरी पाण्याच्या हक्कासाठी प्रसंगी आत्मदहन करू असा ईशारा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यावर कालव्याची साफसफाई लगेचच सुरू केली जाणार आहे. कालवा दुरुस्तीची कामे मुदतीत पूर्ण करू असे ठोस आश्वासन उपविभागीय अभियंता एस. एस. महामुनी यांनी दिले. पाटबंधारेचे मुख्य कार्य. अभियंता मिलिंद पवार यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कालव्याची दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करू, कालव्याचे पाणी मुदतीत सुरू करू असे अभिवचन पवार यांनी दिले.
कालव्याच्या पाण्यासाठीची शेतकऱ्यांमधील सहनशीलता संपत आली आहे. पाण्याबाबत हयगय निदर्शनात आल्यास पाण्यासाठी आत्मदहन करू असा इशारा बळीराजा फाउंडेशनने दिल्याने मुख्यत: पाटबंधारे प्रशासन खडबडून जागे झाले, त्यातून आता कालव्याला पाणी येणार यांचे स्पष्ट संकेत मिळत बळीराजा फाउंडेशनच्या पाणी आंदोलनाला अभूतपूर्ण यश येणार हे अधोरेखीत झाले आहे. तर पाण्यासाठीच्या जनजागृती गाणी, सोबत आणलेली शिदोरी चांगलेच आकर्षण ठरले. हे आंदोलन कमालीचे चर्चेत आले आहे.
