श्रीवर्धन तालुक्यात हजारो रोजगाराची संधी मात्र समन्वयाचा अभाव
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात व्हेरिटास पॉलिकेम या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमुळे रोजगाराची संधी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे परिसरात मोठया प्रमाणावर प्रदूषण होणार असल्याने स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
या प्रकल्पाचे काम पुर्णपणे थांबवण्यासाठी ग्रामसभेतील ठरावाचा आधार घेत दिघी ग्रामपंचायतीने जाहीर नोटीस बजावली आहे. दिघी सरपंच विपुल गोरीवले यांनी हे पत्र व्हेरिटास कंपनीला दिले आहे. या कंपनीमुळे हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत व या भागातील उद्योगधंदे वाढण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतने दिलेल्या पत्रात व्हेरिटास कंपनी कडून विषारी वायू निर्माण होऊन वायुप्रदूषण होणार असल्याचे कारण देत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विरोध केल्याचे सांगितले आहे. दिघी पोर्ट मध्ये व्हेरिटास कंपनीकडून काम सुरू आहे त्याला ही ग्रामस्थांनी विरोध करत काम सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. दिघी पोर्ट मध्ये उभ्या राहत असलेल्या
व्हेरिटास पॉलिकेम या प्रकल्पात पीव्हीसी ग्रॅन्युल्स बनवले जातील जे विविध प्रकारच्या प्लास्टिक वस्तू बनवण्यासाठी इतरत्र पाठवण्यात येईल व पीएमबी म्हणजे प्लास्टिक मिश्रीत डांबर उत्पादन, एलपीजी गॅस बॉटलिंग व सी वॉटर डिसॅलिनेशन असे तीन प्रकल्प होणार आहेत.
व्हेरिटास कंपनीच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या बाबी तपासणी करूनच दिली जाते. मात्र ग्रामस्थांची काही तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही वरिष्ठांना कळवू.
-इंदिरा गायकवाड,
उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महाड
पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जनसुनावणीमध्ये विरोध दर्शविला असताना व्हेरिटास कंपनीला कशी परवानगी मिळते? आमचा या कंपनीला शंभर टक्के विरोध आहे.
-विपुल गोरीवले,
सरपंच दिघी ग्रामपंचायत
