घनःश्याम कडू
उरण : उरण परिसरातील समुद्र किनारी भराव करून त्याठिकाणी पत्र्यांच्या शेड उभ्या करून भाड्याने दिल्या आहेत. तर दांडा परिसरात समुद्र किनारी तारेचे कुंपण घालून जागा बळकाविल्या आहेत. तसेच काही धधनदांडग्यांनी मोठमोठे बंगले उभे केले आहेत. याकडे उरणच्या तहसिल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. उरण तालुक्याला सुंदर असा समुद्र किनारा लाभला असतानाही त्याचे जतन होताना दिसत नाही. आजच्या घडीला समुद्र किनारी मातीचा भराव करून टपर्यांचे मायाजाल उभे राहिले आहे. या टपर्या परप्रातियांना भाड्याने देऊन तेथून नशिली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते. याबाबत काही जागृत नागरिकांनी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आता केगाव दांडा परिसरात भरसमुद्रात सिमेंटचे पोल उभे करून त्यांना तारेचे कुंपण मारून त्या बळकाविल्या जात आहे. ज्याने तारेचे कुंपण घातले आहेत, ते त्या जागेवर आपला हक्क सांगताना दिसतात.
करंजा, मोरा, नागाव, आवरा, पाणजे आदी भागात भरसमुद्रात मोठमोठे बंगले कोणतीही परवानगी न घेता उभे राहिले आहेत. मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी यांनी तहसिल कार्यालयाकडे तक्रार करुन कारवाई करण्यास सांगितले असल्याचे ते सांगतात. समुद्रात अनधिकृत बांधकामे तसेच तारेचे कुंपण घालून जागा बळकाविल्या असतानाही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांची अरेरावी वाढली आहे. तरी तहसिल कार्यालयाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
