परतीच्या पावसामुळे भात कापणीला विलंब
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील शेतकरी भात कापणीसाठी सज्ज झाला आहे. परंतु, कोलाड, खांब परिसरात दोन दिवस अधून मधुन पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी भात कापायचे कि नाही असा संभ्रमात पडला आहे.
गेल्या आठवड्यापासून रोहा तालुक्यातील बहुतांशी भागात भात शेती ही सोन्यासारखी पिवळी दाणेदार झाली आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला परंतु समाधानकारक झाला. नंतर मधील काळात गायब झाला, त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे भातपीक उत्तम प्रकारे दाणेदार झाले आहे. जाणकारांच्या मते हस्त नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नेहमीच धोका देतो. परंतु, हस्त नक्षत्राच्या सुरुवातीला तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडला व नंतर नक्षत्र संपेपर्यंत पूर्णपणे गायब झाला. पुन्हा चित्रा नक्षत्र सुरु झाल्यानंतर चार दिवसांनी पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे तयार झालेले भातपीक कापण्यासाठी सुरुवात करणे धोक्याचे आहे. त्यामुळे भात कापणीला विलंब होत आहे.
शेतकरी सावध भूमिका घेत आहेत. मागील काही वर्षापासुन भातपीक उत्तम प्रकारे तयार होऊनही परतीच्या जोरदार पडलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. याचप्रमाणे काल पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणची भात शेती पडली आहे.
