कर्मचाऱ्यांनी मानले मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे आभार; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!
विठ्ठल ममताबादे
उरण : उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी उरण नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुखांची सानुग्रह अनुदानासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर विविध कामांमध्ये घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त करून त्यायोगे उरण नगरपरिषदेची मान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न विचारात घेऊन दिवाळी सणापूर्वी उरण नगरपरिषदच्या कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून रक्कम रू. २७५००/- मंजूर केला आहे. यावेळी बांधकाम विभागप्रमुख झेड. आर. माने यांनी संघटनेच्या मागणी प्रमाणे ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात मत मांडले. या मागणीला कामगार नेते संतोष पवार यांनी पुष्टी दिली.
यावर आपले मत मांडताना मुख्याधिकारी यांनी कर वसूलीचे काम जर अधिक चांगल्या पद्धतीने झाले तर आपण केलेल्या मागणीनुसार विचारही करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे. त्याच वेळी कामगार नेते संतोष पवार यांनी उरण नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील बोनस दिवाळी पुर्वी मिळाला तर अधिक आनंद होईल अशी मागणी केली. मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील गेल्यावर्षी पेक्षा अधिक बोनस देण्याबाबत संबंधित ठेकेदाराला संबंधित अधिकारी यांना सुचना देण्याबाबत आदेश दिले आहेत.
कामगारांच्या उन्नतीकरीता मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले आहे आणि देत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्यावतीने मनापासून आभार मानले. सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मंजुर झाल्या बद्दलची माहिती मिळाल्याने उरण नगरपरिषदेमधील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
