दिघी जलवाहतूकीचा मनमानी कारभार
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जलवाहतूकीचा कारभार आता मनमानी चालू आहे. उशिराने सुरू होत असलेल्या घाईगडबडीच्या प्रवासाला अनेक अडथळे येत असून, प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत आहे.
दिघी खाडीतून नियमित जंजिरा किल्ल्यासाठी तीन बोटी तसेच आगरदांडावरून मुरुड, अलिबागला जाण्यासाठी दोन फेरी बोट असा होणारा जलवाहतूक प्रवास मुरुड व श्रीवर्धन या दोन तालुक्यातील पर्यटक व स्थानिकांसाठी फायद्याचा ठरत आहे. मात्र, या वाहतुकीच्या कारभारात आता ताळतंत्र राहिले नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. दिघी ते आगरदांडा साडे आठ वाजता सुटणारी फेरीबोट नियमित उशिरा सुटत आहे. त्यांना जेटीवर बोट लावतानाच अर्धा तास निघून जातो. नंतर प्रवाशांच्या आरडाओरड्याने होणारी धावपळ पाण्यातील प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. या कारभारावर येथील अधिकाऱ्यांचे अंकुश नसल्याने दिघी येथील जलवाहतूक समस्येच्या गर्तेत अडकून बसली आहे.
जलवाहतूक प्रवासा दरम्यान सर्व प्रवाशांसाठी सर्व नियम सारखेच आहेत. वेळेत बोट सुटून आपले कामकाज आटोपून घरी परतावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कोणाच्या सांगण्यावरून बोट मधूनच फिरवली जाते असे प्रकार येथे घडत आहेत. त्यामुळे अशा कारभारावर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दिघी खाडीतील जलवाहतूक बद्दल माहिती घेतली जाईल. तसे सांगण्यात येईल.
-समीर बारापत्रे,
मेरीटाईम अधिकारी.
१० ऑक्टोबरला दिघी येथून आगरदांडाकडे जाणारी साडेचार वाजताची फेरीबोट अर्धातास उशिरा सुटली. पुढे कोणाच्या तरी सांगण्यावरून खाजगी कामासाठी मधूनच पुन्हा बोट दिघीकडे फिरवण्यात आली. मात्र, असा मनमानी कारभार चालविण्यासाठी यांना अधिकार दिले कोणी ?
-वैभव खोत, प्रवासी.
