मुख्याधिकारी यांनी आदेश देऊनही ठेकेदाराचे दुर्लक्ष
घन:श्याम कडू
उरण : उरण शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसत असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी आदेश देऊनही नगरपालिका आरोग्य निरीक्षक हरेश तेजी व ठेकेदार चुना लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शहरातील विविध भागामध्ये कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसत आहेत. कचऱ्यामुळे रस्त्यावर बेकायदा डम्पिंग यार्ड बनले आहे. शहरात ठिकठिकाणी घाण पसरली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरवस्था होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरपरिषदेने कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या कंपनीच्या कंत्राटदाराकडे नादुरुस्त वाहने, गाड्यांची संख्या ही दिल्यापेक्षा कमी तसेच कमी सफाई कर्मचाऱ्यांसह कामे करून घेतली जात आहेत. कचरा ठेकेदार व नगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख हरेश तेजी यांच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
कचरा उचलण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी नियमांचे उल्लंघन करून ज्या गाड्या आणल्या आहेत त्या भंगार व कमी तसेच त्यांची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे समजते. तसेच कामगारांनाही कोणतीही सुरक्षितता न देता वेठबिगारा सारखे राबविले जात असल्याचे खुद्द कामगार वर्गच सांगतात. याबाबत वारंवार तक्रार करूनही आरोग्य निरीक्षक प्रमुख हरेश तेजी कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. यावरून त्यांचे ठेकेदारासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बोरी गावात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. चौकाचौकात लोक कचरा टाकतात. कचरा वेळीच उचलला जात नाही. परिणामी तो कुजतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत बोरी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले असता, त्यांनी त्वरित दखल घेत कचरा उचलण्याचे आदेश दिले होते. परंतु, पुन्हा दोन दिवसांनी परिस्थिती जैसें थे असल्याचे दिसते.
| याबाबत आज पुन्हा नगरपालिका आरोग्य निरीक्षक हरेश तेजी व ठेकरदार मुकादम प्रवीण शिंदे यांच्या कानावर घालून जर कचरा वेळच्या वेळी उचलला गेला नाही तर तोच कचरा नगरपालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. |
