श्री रविप्रभा मित्र संस्थेनी केला मुंडे दाम्पत्यांचा सत्कार
वैभव कळस
म्हसळा : म्हसळा तालुक्यातील चिखलप येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा म्हसळाचे व्यवस्थापक मंगेश मुंडे यांचे यकृत पूर्णपणे निकामे झाले होते, त्यांना समोर फक्त मृत्यू दिसत होता. अशा परिस्थितीत या आधुनिक काळातही पती हेच परमेश्वर मानणारी त्यांची पत्नी मनाली मंगेश मुंडे यांनी क्षणाचाही विचार अगर परिणामांचा विचार न करता पतीचा जीव वाचविण्याचा निश्चय करून २०१९ साली स्वतःचे यकृत पतीला दान करून पतीला पुनर्जन्म देण्याचे महान कार्य केले.
श्री रविप्रभा मित्र मंडळ म्हसळा आणि ग्रामिण रुग्णालय म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान टि. बी.मुक्त भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे संपन्न झाला. रविप्रभा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील क्षय रोगी रुग्णांना सहा महिने पुरेल एवढे पोषक आहार किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंडे दाम्पत्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अवयव दानासारखे महान कार्य दुसरं कोणतंही नाही, परंतू आजपर्यंत या कामाचे कौतुक कोणी करू नये ही खंत मान्यवरांकडून चर्चेत होती. ती खंत रवीप्रभा या संस्थेने भरून काढली आणि साऱ्यांच्याच कौतुकास पात्र ठरले.
अधिक्षक डॉ. महेश मेथा यांनी अवयव दानाबद्दल विशेष मार्गदर्शन करून त्याबाबत शपथ ग्रहण केली.या प्रसंगी पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश मेहता,संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती रविंद्र लाड, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कापरे, भाजप माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मुंडे, रायगड बँक म्हसळा व्यवस्थापक मंगेश मुंडे,मनाली मुंडे, संस्थेचे सचिव नितीन रिकामे, ग्रामसेवक योगेश पाटील, सुशांत लाड, समीर लांजेकर, स्वप्नील लाड, दत्ता लटके, शांताराम घोले आदि मान्यवर उपस्थित होते. नर्स कुमारी काते हिने सर्वांचे स्वागत केले. संतोष उद्धरकर यांनी प्रास्ताविक केले तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीम. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
