मिलिंद माने
महाड : पावसाळा संपण्या अगोदरच व भात शेतीच्या कापणीला सुरुवात होण्यापूर्वी ऑक्टोबर हिटने कहर केला असून मे महिन्यातील उष्णता ऑक्टोबरमध्ये जाणवत असल्याचा फायदा घेऊन कोकणातील रायगड जिल्ह्यात परप्रांतीय विक्रेत्यांनी थंड पाण्यासाठी माठ विक्रीसाठी आणले असून मागील वर्षापेक्षा शंभर रुपये जास्त किमतीत हे परप्रांतीय माठ विक्रेते कोकणातील रस्त्यांवर माठ विकण्याचा धंदा त्यांनी चालू केला आहे.
कोकणात पावसाळी हंगाम संपण्याची चिन्हे असून परतीचा पाऊस चालू झाला आहे. त्यातच कोकणात भात कापणीचा हंगाम आत्ता चालू होत आहे. भात कापणीमुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत असल्याने कोकणातील नागरिक कमालीचा हैराण झाला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात भात कापणीचा हंगाम चालू झाला आहे. मात्र, सकाळच मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर हवेत पडत असून हवेत अद्यापही म्हणावा तसा गारवा जाणवत नसल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच उष्णता जाणवायला सुरुवात होत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात मागील वर्षी 50 डिग्री सेल्सियस वर उन्हाळ्यात तापमान गेले होते. चालू वर्षी त्यापेक्षाही जास्त तापमान होण्याची चिन्हे आत्तापासूनच जाणवू लागली आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातच 41 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या उकाड्याला दिलासा देण्यासाठी थंड पाण्याची सोय म्हणून परप्रांतीय माठ विक्रेत्यांनी आत्तापासूनच रायगड जिल्ह्यातील मोक्याच्या जागी बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी दोनशे रुपयाला असणारा थंड पाण्याचा माठ यावर्षी 300 रुपये ते साडे तीनशे रुपये दराने हे परप्रांतीय माठ विक्रेते विकत आहेत.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंड पाण्याचे माठ घडविण्याचे काम पूर्वी कुंभार समाजाकडून केले जायचे. मात्र, या व्यवसायाला आता उतरती कळा लागली आहे. पूर्वीची पिढी माठ बनवण्याच्या कामात अग्रेसर होती मात्र, आता नवीन पिढी हा पारंपारिक व्यवसाय करण्यास नकार देत असल्याने गावोगावी माठ बनवणारे कुंभार आता जवळजवळ दुर्मिळ झाले आहेत. त्याचाच फायदा या परप्रांतीय माठ विक्रेत्यांनी घेतला असून म्हणेल त्या किंमतीला ते माठ विकत आहेत.
परप्रांतीय माठ विक्रेत्यांचे शासकीय जागांवर अतिक्रमण!
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणारे माठ विक्रेते राज्य शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या असणाऱ्या पडीक जागांवर हे अतिक्रमण करून आणलेले माठ एका जागी ठेवण्याचा उद्योग करतात. मात्र, या शासकीय जागांवर पाच पाच महिने अतिक्रमण करून देखील त्याबाबत शासकीय अधिकारी तोंडातून ब्र देखील काढत नाहीत. मात्र, स्थानिक नागरिकांनी या जागेवर एखादी व्यवसायासाठी टपरी टाकली तर त्याने अतिक्रमण केले म्हणून त्यावर कारवाई करण्याचे काम हे शासकीय अधिकारी करतात. मात्र, या परप्रांतीय माठ विक्रेत्यांना हे शासकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत का? अथवा त्या जागांवर अतिक्रमण करताना देखील या शासकीय अधिकाऱ्यांना डोळ्यांनी दिसत असताना देखील ते काळी पट्टी बांधून का गप्प आहेत? असा सवाल विचारला जात आहे
महाड शहराजवळील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जवळील दुग्धविकास खात्याच्या जमिनीवर (सध्याही जमीन एनडीआरएफला त्यांचा बेस कॅम्प करण्यासाठी हस्तांतरित केली आहे) या जागेवर या परप्रांतीय माठ विक्रेत्यांनी बसताना मांडले आहे. त्याबाबत ना त्यांची नोंदणी पोलीस ठाण्याकडे ना महसूल विभागाकडे त्यामुळे या ठिकाणी एखादा गंभीर प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
