लहान मुलांसह दुचाकीस्वार भटक्या कुत्र्यांचे टार्गेट!
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. भूतदयेपोटी भटक्या कुत्र्यांना अन्न देणारे स्वत:च्या घरात सुरक्षित राहत असले तरी फुकटच्या अन्नावर माजलेले भटके कुत्रे रात्रीच्या वेळी पादचारी तसेच दुचाकीस्वारांसाठी धोकादायक बनत असताना धाटाव परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सर्वच पातळीवर अपयश आल्याचे पहावयास मिळत आहे.
भटक्या कुत्र्यांनी धाटाव परिसातील गाव, धाटाव नाका, बारसोली, विष्णूनगर, हुडको कॉलनी, मलखंडवाडी याठिकाणी असलेल्या कचराकुंड्या, उकिरडा, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायट्या, औद्योगिक वसाहत परिसर तर सार्वजनिक ठिकाणांवर आपली जबरदस्त हुकूमत ठेवल्याचे दिसून येते. विविध ठिकाणी असलेले हॉटेल, मटण, चिकन, मच्छी विक्रेत्याकडून त्यांचा कचरा नाला अथवा कचराकुंडीच्या आसपास टाकला जातो. रस्त्यालगत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चायनीज दुकानांतून सुद्धा खाद्य पदार्थ हे भर रस्त्यातच टाकले जात आहेत. सदर कचऱ्याची विल्हेवाट ही नियोजित ठिकाणी योग्य पद्धतीने होत नसल्यासारखी अनेक कारणे समोर येत असल्याने या भटक्या कुत्र्यांनी सर्व परिसरात अक्षरशः हैदोस घालून कुत्र्यांनी त्यांच्या त्या त्या ठिकाणी चांगल्याच टोळक्या तयार केल्या असल्याचे पहावयास मिळत आहे.
रस्त्याने जाणाऱ्या लहान शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या शाळकरी विद्यार्थ्यांना भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः टार्गेट केल्यामुळे भीतीने शाळेत जाण्यास मुले टाळाटाळ करत असल्याच्या पालक वर्गांच्याही तक्रारी समोर येत आहेत. रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना कुत्री अंगावर धाऊन येत असल्याने दुचाकीचालकांचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी ही कुत्री दबा धरून बसून अचानक दुचाकीस्वारांच्या समोर येतात. त्यामुळे दुचाकी वर असलेल्या महिला,लहान मुलं घाबरून, गोंधळून जाऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी कुत्र्यांची झुंबडच असून गाडीचा प्रकाश दिसताच जणू काही सावजच येत आहे असे समजत गाडीसोबत धावतात. या परिस्थितीत दुचाकी जोरात दामटवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्री रस्त्याने ये-जा करणेच कठीण झाले असून चालतच नव्हे, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा हे कुत्रे पाठलाग करतात.प्रतिबंधात्मक उपाययोजना पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे सर्वत्र बेवारस कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात संबंधित प्रशासन ठोस कोणती आणि काय भूमिका घेणार? याकडे आता सर्व धाटाववासियांचे लक्ष लागले आहे.
