जेएसएम महाविद्यालयामध्ये झाले अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन
विनायक पाटील
पेण : जे. एस. एम. कॉलेजमध्ये आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पश्चिम विभाग केंद्राच्या सहकार्याने सहकार्याने एका अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. ICAI पश्चिम विभाग केंद्राचे अध्यक्ष सीए अर्पित काबरा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या भाषणात अर्पित काबरा यांनी हे म्युझियम उभारण्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले व ICAI च्या सहकार्याने महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम सुरू करावेत असे आवाहन केले. देशातील १४० कोटी लोकांचे वित्तीय व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट आर्मी कशी कार्यरत आहे तसेच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी महाविद्यालयात कॉमर्स विभागामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार क्षेत्रातील नवनवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमाचे आयोजन केले जाते तसेच ICAI द्वारे दिलेले उपक्रम महाविद्यालयात राबविल्यास महाविद्यालयाकडे असलेल्या प्रत्येक भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध केल्या जातील असे आश्वासन दिले.
ICAI च्या WIRC विभागाचे विभागाचे खजिनदार सीए केतन सैया यांनी ICAI ही भारतातील एक महत्त्वाची संस्था असून प्रत्येक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यावर भर दिला तर स्वतःचे आणि देशाचे भविष्य बदलण्यासाठी सनदी लेखापाल होण्याकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतामध्ये असलेल्या २५ अकाउंटन्सी म्युझियममध्ये आपल्या महाविद्यालयाचा सहभाग झालेला आहे आणि हि बाब महाविद्यालयास गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या जवळपास ५०% विद्यार्थी संख्या असलेल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटन्सी म्युझियमचा निश्चित फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या म्युझियममध्ये चार्टर्ड अकाउंटंट चा इतिहास व भारतातील झालेल्या प्रगतीचा आलेख व अनेक दुर्मिळ दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला आहे असे सांगितले.
उद्घाटनाच्या निमित्ताने WIRC चे प्रादेशिक परिषद सदस्य सीए. संजय निकम रायगड टॅक्स कन्सल्टंसी असोसिएशनचे अध्यक्ष सीए. जगदीश तांडेल, सीए. राजेश जगे, सीए. कौस्तुभ जोशी, सीए. विजय साळस्कर, सीए. संजय राऊत, सीए. सचिन गांधी, सीए. प्रज्ञा शिरधनकर आणि इतर मान्यवर तसेच महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कॉमर्स विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी गुलाब पुष्प देऊन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. आश्विनी आठवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सौ. श्वेता पाटील यांनी केले. अकाउंटन्सी म्युझियमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील प्रत्येक सभासदांनी मेहनत घेतली यामध्ये प्रा. विनायक साळुंखे आणि प्रा. शंतनू वालदे यांची महत्त्वाची भूमिका आहे.
