दोन बहिणींच्या हत्येच्या घटनेने अलिबाग तालुका हादरला
अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यातील चौल भोवाळे येथे अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित मोठ्या भावाने दोन सख्ख्या बहिणींना उंदीर मारण्याचे विषारी औषध देवून हत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, अलिबाग तालक्यातील चौल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोवाळे येथे जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली शंकर मोहिते (वय 34) व स्नेहल शंकर मोहिते (वय 30) या दोन बहिणींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दिनांक 16/10/2023 रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सोनाली शंकर मोहिते हिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याबाबतची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्यात मिळाली असता रेवदंडा पोलिस ठाण्यात मयतेचा भाऊ गणेश शंकर मोहिते याची फिर्याद घेवुन अकस्मात मृत्यू नं.28/2023 प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत सोनाली मोहिते हिच्या मृतदेहावर पंचनामा करून सोनाली शंकर मोहिते हिचा मृतदेह शवविच्छेदन करून तिचे प्रेत अंतविधीकरिता भाऊ गणेश शंकर मोहिते यांचे ताब्यात देण्यात आले होते. सदर अकस्मात मृत्यूचे चौकशीमध्ये असे आढळून की, मयत सोनालीचा मृत्यू जेवणातील विषबाधेमुळे झाला आहे हे सिद्ध झाले.

दिनांक 17/10/2023 रोजी सदर मयत सोनाली हिचा भाऊ गणेश मोहिते याने त्याची दुसरी बहिण स्नेहल शंकर मोहिते (वय 30) हिला देखील उलट्यांचा त्रास होत असल्याने तिला जिल्हा शासकीय हॉस्पिटल अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल केले. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रावरून सदर मुलीचा मृत्युपूर्व जबाब नोंद केला आहे. तिने तिच्या जबाबात सांगितले की, दि. 15/10/2023 रोजी रात्री 8:15 वाजता ती व तिची मोठी बहिण सोनाली यांना तिचा भाऊ गणेश याने सूप बनवून आणून २ प्लेटमध्ये त्यांना पिण्यास दिले व त्यांच्या आईने तांब्यात पाणी पिण्यास दिले होते. सदर पाणी हे स्वत: व मयत बहिण प्यायल्या होत्या. त्यानंतर मोठी मुलगी सोनाली हिला उलट्या झाल्याने उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असता दिनांक 16/10/2023 रोजी साडे सहा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दि. 20/10/2023 रोजी सदर मयत मुलीची आई जयमाला शंकर मोहिते (वय-56) हिने रेवदंडा पोलीस ठाणे येथे येवून तक्रार दिली की, त्यांचे नातेवाईक (भावकीतील लोक) यांच्यामध्ये बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण चालू आहे. सदर वादामधूनच हा प्रकार घडला असावा असे सांगितले. तिने तिच्या मयत मुलींना तिचा मुलगा गणेश याने सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून ठेवला होता. सदरचे पाणी बहिणी पीत होत्या. सदरचे पाणी तिने घराबाहेर ठेवले होते. त्यावेळी तिच्या भावकीतील नातेवाईक त्यांना मारण्याच्या उद्देशाने विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुली मयत झाल्या असाव्यात. सदर बाबत तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होणेकामी फिर्याद दिली.
त्यावरून दिनांक 20/10/2023 रोजी गुर.नं. 191/2023 रोजी भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दिनांक 21/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या अधिनिस्त अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल शिर्के, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे व पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांनी सदर घटनास्थळी जावून भेट दिली. सदर गुन्हा फिर्यादी व मुलगा गणेश शंकर मोहिते याचेकडे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे व तपास पथकाने सदर घटनेबाबत सखोल चौकशी केली. सदर चौकशीमध्ये असे आढळून आले की, मयत मुलींचे वडील हे वनविभाग अधिकारी म्हणून सेवेत होते. ते सन 2009 मध्ये मयत झाले. त्यानंतर अनुकंपतत्वावर नोकरी मिळणेबाबत मयत मुलीची आईने तिचे मयत मुलींना सदरची नोकरी मिळावी व भावाला मिळू नये असे मत होते. याबाबत त्यांचे बऱ्याच वर्षांपासून घरात मयत मुली व आई आणि त्यांचा भाऊ यांचेमध्ये वादविवाद चालू होते.
फिर्यादी यांचेकडे चौकशीमध्ये असे आढळून आले की, त्यांचा मुलगा गणेश शंकर मोहिते त्याची वर्तणूक चांगली नव्हती व त्यांच्या खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढत होता. त्यांचे पती मयत झालेनंतर पतीच्या नावे असलेले घर गणेश याने त्यांना व मयत मुलींना विश्वासात न घेता, माहिती न देता स्वतःचे नावे करून घेतले होते. त्यामुळे त्यांचे अनुकंपावर मुलाला नोकरी न मिळता त्यांचे मुलीला मिळावी असे मत होते. त्याअनुषंगाने अधिक पडताळणी केली असता मयत सोनालीचे बॅगमध्ये व घरातीत काही कागदपत्रे त्यामध्ये देखील फिर्यादी यांनी वनविभागाला व पोलीस ठाणेला मुलगा यांचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीचे कागद मिळून आले. त्यावरून मुलगा गणेश याचेकडे सखोल चौकशी केला असता असे आढळून आले की, त्याने आई व मयत बहिणीना काही आश्वासन देवून त्यांचेकडून नाहरकत घेवून 2021 साली अनुकंपा तत्वावर नोकरी प्राप्त केली. गेले १ वर्षापासून तो, त्यांची आई व बहिणी यांचेसह मौजे पो. भोवाळे, रेवदंडा ता. अलिबाग याठिकाणी राहत होता. त्या तिघींना घेवून त्यांचे घरी घेवून आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत ते तेथेच राहत होते.
सदर घटनेबाबत मुलगा गणेश योग्य माहिती देत नसल्याने त्याचेवर संशय वाढला. त्यावरून त्याचा मोबाईल ताब्यात घेवून त्याची पाहणी केली असता मोबाईलची गुगुल हिस्ट्री चेक केली असता त्याने दिनांक 11/10/2023 ते दिनांक 14/10/2023 पर्यंत एकूण 53 वेळा वेगवगळे विषारी औषधे सर्च केल्याचे आढळून आले. त्यामध्ये चव असलेले विष, वास न येत असेलेले तसेच झोपेच्या गोळ्या सदर विषाने किती दिवसात मृत्यू होवू शकतो इत्यादी बाबी आढळून आल्या. त्याअनुषंगाने संशय वाढल्यामुळे तो वापरत असलेली कार हिची झडती घेतली असता सदर कारच्या डिकीत पिशवीमध्ये उंदीर मारण्याच्या औषधांच्या पिशव्या एका कोपऱ्यात लपवून ठेवल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता मयत मुलींचा भाऊ गणेश याने त्यांचे नावावर करून घेतलेले घर, अनुकंपावर नोकरी प्राप्त करून घेत असताना आई व बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे त्यांचेत वाद चालू होता. दोन्ही मयत बहिणी अविवाहित होत्या. भाऊ गणेश याचेकडे हिश्श्याची मागणी करीत होत्या. सर्व कारणावरून त्याने दोन्ही बहिणींना जीवेठार मारण्याचा निश्चय केला. दोन्ही
बहिणींना विश्वासात घेवून दिनांक 15/10/2023 रोजी रात्री त्यांना पिण्यासाठी सूप आणून दिले. त्यामध्ये दोघांना वेगवेगळ्या दोन प्लेट मध्ये RATOL उंदीर मारण्याचे औषध घालून जीवे ठार मारले असे तपासात निष्पन्न झाले. त्याच दिवशी भाऊ गणेश याला सदर गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयासमोर हजर करून दिनांक 25/10/2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलिस नाईक अक्षय जाधव, पोलिस नाईक विशाल आवळे, पोलिस नाईक सचिन वावेकर, पोलिस शिपाई अक्षय सावंत, पोलिस शिपाई लालासो वाघमोडे यांनी गुन्ह्याचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
