शामकांत नेरपगार
नागोठणे : येथील खडकआळीतील रहिवाशी विकास प्रकाश भोपी (वय 41) व दिपक दत्तू बोरकर (वय 43) या दोघांमध्ये झालेल्या मारामारीत दुर्दैवी दिपक बोरकर याचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना सोमवारी (दि. 23) नागोठणे अंबा नदी स्मशानभूमीच्या पारावर दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत मयत दिपक बोरकर याचा मोठा भाऊ लक्ष्मण बोरकर (वय – 49) यांनी नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून आरोपी विकास भोपी यांस नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मयत दिपक बोरकर याच्या पश्चात पत्नी, एक मुलागा, एक मुलगी, आई, तीन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
याबाबत नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी (दि. 24) दुपारी आरोपी विकास भोपी व मयत दिपक बोरकर हे नागोठणे अंबा नदी स्मशानभूमीच्या पारावर गप्पागोष्टी करत असताना त्यांचे आपापसात भांडण होऊन त्यांनी एकमेकांना आई बहिणीवरून शिवीगाळ केली. या रागाने विकास भोपी याने दिपक बोरकर याच्या छातीमध्ये हाताबुक्क्याने ताकतीने ठोसे मारले त्यामुळे दिपक खाली पडला. दिपक खाली पडल्यावर सुद्धा विकासने पुन्हा दिपकला पायाने छातीमध्ये व पोटामध्ये लाथा मारल्यामुळे दिपक जागीच ठार झाला. याबाबत नागोठणे पोलिसांनी आरोपी विकास भोपी याच्यावर गु. र. नं.0147/ 2023 भा. द. वी. कलम 302, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सपोनि संदिप पोमण हे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
