दसरा मेळावा जल्लोषात संपन्न
विनोद भोईर
पाली : सुधागड तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकास आणि आपल्या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्यातील व्यक्तिगत हेवेदावे राजकारण बाजूला ठेवून लढण्याकरिता संघटित होणं हे आजच्या घडीला गरजेचे आहे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी केले. गेली कित्येक वर्ष परंपरेनुसार मराठा समाजाचा दसरा मेळावा साजरा करण्यात येतो. या वर्षीचा मेळावा मंगळवारी मराठा समाज भवन येथील स. स. साजेकर सभागृहात अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते समाज बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस जीवन साजेकर, कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, खजिनदार योगेश मोरे, मध्यवर्ती कार्यकारणी विभागीय कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजातील बहुसंख्य कुटुंब हे खूप हलाखीचे दिवस काढून आपल्या परिवाराचा गाडा चालवीत आहेत. आपण खुल्या प्रवर्गात मोडत असल्यामुळे आपल्या मुलांकडे शैक्षणिक गुणवत्ता असून देखील आपल्याला आरक्षणाचा लाभ नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे बेकारी वाढलेली आहे. शेती आहे परंतु शेतीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे शेती ओस पडली तर काहींनी शेती कवडीमोड किंमतीत विकून टाकली. या सर्व समस्येवर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर आपल्याला सर्व समाज बांधवांची एकजूट आणि सुसंवाद घडवणे महत्त्वाचे आहे. तेच काम आपल्याला सुधागड तालुका मराठा समाज संघटनेच्या माध्यमातून साध्य करायचे आहे असे साजेकर यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहून शेवटी विचारच सोन लुटून दसरा मेळाव्याच्या आनंद घेतला.
११ समितीच्या माध्यमातून साधणार मराठा समाज बांधवांचा विकास
- मराठा गणना समिती
- शिक्षण समिती
- कृषी समिती
- आरोग्य समिती
- उद्योग व रोजगार समिती
- क्रिडा व सण-उत्सव समिती
- गडकिल्ले व वन संवर्धन समिती
- रूढी परंपरा व कायदे समिती
- दिनदर्शिका समिती
- आधार समिती
- मास-मीडिया / जनसंपर्क समिती
वरील प्रत्यक समितीमध्ये ११ सदस्य असणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी दिली