राजेश काफरे यांचे आमरण उपोषण; मुस्लिम, धनगर यांसह सर्वच समाजाचा पाठिंबा
शशिकांत मोरे
धाटाव : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है…अशा घोषणांनी मंगळवारी रोहा शहर अक्षरशः दणाणले. मंगळवारपासून सुरू झालेले तीन दिवसीय मराठा आरक्षण, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणात उपस्थित शेकडो मराठा बांधव, भगिनीनी आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, माघार नाही..असा जयघोष करत निर्धार केला. रोहा सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली रोहा नगरपालिकेसमोरील प्रांगणात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, छत्रपती शिवाजी महाराज की जय जयघोष करून साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. दरम्यान, युवासेनेचे तालुकाप्रमुख राजेश काफरे यांनी पदाचा राजीनामा दिला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, आरक्षण मिळायलाच हवे, शासनाच्या निषेधार्थ व नकारात्मक भूमिकेविरोधात राजीनामा देत आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण करणार असल्याचे काफरे यांनी जाहीर केल्याने प्रशासन लोकप्रतिनिधी यांची चांगलीच झोप उडाल्याचे समोर आले आहे, तर मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागेल. त्यातून सरकारची सुटका नाही, मराठ्यांची सहनशिलता संपत आली आहे, असा गर्भित ईशारा ज्येष्ठ नेते व्ही. टी. देशमुख यांनी दिल्याने मराठा आरक्षण मुद्दा अधिकच पेटणार हे समोर आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर सबंध राज्यात गंभीर स्थिती आहे. आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी आरक्षण मुद्यावर ठाम राहत आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. आरक्षण मुख्यतः मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रायगड जिल्ह्यात मराठ्यांनी ठिकठिकाणी साखळी उपोषण, आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यात मोठा असलेल्या रोहा सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण मंगळवारपासून सुरू झाले. नागोठणे, चणेरा, घोसाळे, कोलाड, मेढा, धाटाव, किल्ला विभागावर साखळी उपोषण होणार आहे. मंगळवारी सकाळी साखळी उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ नेते व्ही. टी. देशमुख,अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख, विजय मोरे, विनोद पाशिलकर, समीर शेडगे, नितीन परब, राजेश काफरे, महेश सरदार, प्रशांत देशमुख, प्राजक्ता चव्हाण, रत्नप्रभा काफरे, स्वरांजली शिर्के, समीक्षा बामणे, मयुरा मोरे, निलेश शिर्के, अमित उकडे, मयूर पायगुडे आदी नेतेगण व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षण साखळी पोषणात लोकप्रतिनिधींना एन्ट्री नाही हे कालच समाजाने जाहीर केले होते. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री किमान तीन दिवस रोह्याकडे फिरकणार नाहीत, हे स्पष्ट झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यासाठी रायगडमधील खासदार, आमदार यांनी प्रामाणिक काहीच प्रयत्न केले नाहीत. अखेर जरांगे पाटील यांच्या आरक्षण समर्थनार्थ रोह्यात साखळी उपोषण सुरू झाले. यावेळी व्ही. टी. देशमुख, समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, समीर शेडगे, रोशन देशमुख, नारायण धनवी, सूर्यकांत मोरे, सुहास येरुणकर, राजेंद्र जाधव, मुस्लिम बांधव अल्ताफ चोरडेकर यांची भाषणे झाली. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी सबंध रोहा तालुका दणाणून सोडला.
मराठा आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांचा भाषणात खरपूस समाचार घेत उदोउदो केला. दुसरीकडे आरक्षण व आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट युवा सेनेचे प्रमुख राजेश काफरे यांनी पदाचा राजीनामा देत तीन दिवस आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले. त्यामुळे रोह्यातील मराठा आरक्षण मुद्यावर वातावरण अधिक तापणार आहे. जिल्ह्यात पहिलेच रोहा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी राजेश काफरे यांचे आमरण उपोषण होणार असल्याचे समोर आल्याने सर्वच यंत्रणा कमालीची सतर्क झाली. मंगळवारपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम, धनगर समाज यांसह विविध समाज, संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी मराठा समाजातील भजन सम्राट, कलावंत यांनी गाण्यातून प्रबोधन केले. शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाची वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, देवीचा जागर गोंधळ, भजनाने प्रबोधन सुरू आहे. साखळी उपोषण यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, विभागवार प्रमुख, असंख्य कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणात युवा सेनेचे प्रमुख राजेश काफरे यांनी पदाचा राजीनामा देत तीन दिवस आमरण उपोषणाची घोषणा केल्याच्या घटनेने रोहा मराठा समाजाचे आंदोलन सबंध जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे.