वैशाली कडू
उरण : शहर व तालुक्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी उन्हाची सवय होईपर्यंत रात्री थंडी पडत आहे. या लगेच बदलणाऱ्या वातावरणामुळे प्रत्येक घरातील किमान एक-दोघे तरी आजारी पडत आहेत. कमाल-किमान तापमानातील घट, ढगाळ हवा अशा वातावरणामुळे शहरात घरोघरी सर्दी, ताप, खोकल्याच्या ‘व्हायरल फ्लू’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे सध्या क्लिनिकपासून ते शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी वाढत आहे.
सध्याचे वातावरण हे दुपारी गरम आणि रात्री थंड असे आहे. या दोन्ही तापमानात शरीर अनुकूल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शरीराला योग्य समतोल साधता येत नाही. याचा परिणाम म्हणून सर्दी, खोकला, ताप, अस्थमा आदी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शक्यतो बाहेर पडणे टाळा, खूपच गरजेचे असल्यास बाहेर जावे, साध्या कारणासाठी बाहेर पडणे टाळावे, सकाळी व रात्री गरम कपडे घालावे, थंड पदार्थ टाळून गरम व ताजे अन्न सेवन करावे.