व्हाट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर
घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे. आपण आजपर्यंत केलेली कामे तसेच भविष्यातील करणार असलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगून मतदारांना भुरळ घालण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने 5 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून हवसे, नवसे, गवसे गुढग्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्या अगोदरच प्रचाराला सुरवात केल्याचे पहायला मिळत आहे. काही गावांमध्ये सदस्य बिनविरोध निवडणुन आले आहेत. राजकीय पक्षांच्या समर्थकांसह काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने प्रचाराचा धुराळा उडायला लागला आहे.
बहुतांश उमेदवारांनी आकर्षक गाण्यांवर व्हिडिओ क्लिप, पोस्टर तयार केले आहेत. व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर करीत गावच्या विकासासाठी तरुणाईला साद घालत आहेत. गावात झालेली विकासकामे आपल्यामुळेच झाली असल्याचा दावा बहुतांशी उमेदवारांकडून केला जात आहे. परंतु कोण बाजी मारतो याचा फैसला दि. ६ नोव्हेंबर रोजी होईल तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
