स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान
प्रतिनिधी
महाड : महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात नुकसान झाले असून कंपनीत काम करणारे पाच कामगार देखील जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना एमएमएसी इ. टी. पी. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबरमध्ये जेट इन्सुलेशन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागून भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टरचा स्फोट झाला. यामुळे येथील आग पसरली गेली आणि रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटांच्या दणक्याने कामगार जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या विरल, झुआरी आणि ऍक्वाफार्म या कंपनीतील कामगारांनी देखील कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली त्या प्लांटच्या शेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने विरल कंपनीच्या कामगारांनी आग विझविण्यास सुरुवात केली. या स्फोटात कंपनीच्या प्लांटचे अतोनात नुकसान झाले आहे. दहा वाजता लागलेली आग दुपारी बारा वाजले तरी आटोक्यात आणता आली नव्हती.
जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत सुमारे सतरा कामगार काम करत होते. आग लागताच अनेकजणांनी कंपनी बाहेर पळ काढला. मात्र, प्लांटमध्ये काम करणारे कंपनीमधील विक्रम डेरे, निमाई मुरमक, मयूर निंबाळकर, राहुल गिरासे, स्वप्निल आंब्रे हे कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. यातील विक्रम डेरे हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचाराकरिता स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली.
महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर?
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या केमिकल कंपन्यांपैकी कोणत्यातरी एका कंपनीत दर पंधरा दिवसांनी आग लागणे, कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट होणे, यातून कामगार जखमी होणे किंवा कामगार मृत पावणे यासारख्या घटना महाड औद्योगिक वसाहतीमध्ये नित्यनियमाच्या झाल्या आहेत का? असा सवाल. अनेक कंपन्यातील कामगार राज्य सरकारला विचारीत आहेत.
महाड औद्योगिक वसाहती मधील केमिकल कंपन्यांमधल्या बॉयलर व रिऍक्टरची तपासणी करण्यासाठी येणारे सुरक्षा अधिकारी महाड मधील पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन वास्तव्य करतात व त्या ठिकाणीच बसून आपला कागदी रिपोर्ट बनवून पाकिटे घेऊन निघून जात असल्याने कंपनीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर पडली असल्याचे या निमित्ताने आज घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
