विश्वास निकम
गोवे-कोलाड : येरळ ग्रामपंचायत कार्यालयात दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. सरपंच पदासाठी अनुसूचित जाती जमातीची जागा असल्यामुळे सरपंच पदी सुरेश गंगाराम जाधव यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच पदासाठी कविता कृष्णा तटकरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपसरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात होते. कविता कृष्णा तटकरे व प्रसाद विष्णु मोरे यांनी अर्ज दाखल केले होते व एकूण दहा जणांनी मतदान केले. यापैकी कविता कृष्णा तटकरे यांना ७ मते तर प्रसाद विष्णु मोरे यांना ३ मते मिळाली, यामुळे कविता कृष्णा तटकरे ४ मतांनी विजयी झाल्यामुळे त्यांची येरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सुनील सुतार यांनी काम पाहिले. तर पूर्वीच्या सरपंच विमल चिंतामण दळवी यांनी नवनिर्वाचित सरपंच यांना खुर्चीवर बसवून अभिनंदन केले. तसेच सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. विजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. तर ग्रामसेवक ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. बालविकास व महिला मंत्री अदितीताई तटकरे यांनी धावती भेट देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
