राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चुकीचे सर्व्हेक्षण प्रवाशांच्या जीवावर बेतणार?
मिलिंद माने
महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत असताना या महामार्गाचे काम करणाऱ्या सद्य ठेकेदार कंपन्यांकडून महामार्गाचे काम आटोपण्याची घिसाडघाई केली जात आहे. महाड तालुक्यातील दासगाव खिंड येथील काम वन विभागाच्या आडकाठीमुळे रखडले होते. मात्र आता परवानगी मिळाल्यानंतर काम सुरु केले असले तरी येथील धोकादायक वळण कायम राहिले असल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव खिंड हा ब्लॅक स्पॉट ठरणार असून महामार्गाच्या चुकीच्या सर्व्हेक्षणामुळे भविष्यात या महामार्गावर हा स्पॉट प्रवाशांच्या जीवावर बेतणार अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. यामुळे येथील अपघाताची शक्यता आजही कायम राहणार आहे.

मागील पंधरा वर्षापासून कोकणवासियांचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे स्वप्न आजही पंधरा वर्षानंतर पूर्णत्वास आलेले नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. आजही जागोजागी भूसंपादन अडथळे, अर्धवट मोऱ्यांची कामे, बाह्यवळणाच्या जागी असणारे खड्डे दिशादर्शक फलकांचा अभाव, रस्त्यातील खोदकाम यामुळे महामार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात जवळ पास ६० किलोमीटरचे काम पुन्हा नव्याने काँक्रीटीकरण करून पुन्हा नव्याने सुरु झाले आहे. तर इंदापूर ते कशेडीपर्यंत असलेला दुसरा टप्पा जवळ पास ९० टक्के पूर्ण झाला आहे. मात्र महाड तालुक्यातील दासगाव खिंड या पट्ट्यातील भूभाग हा सुरुवातीपासून आजपर्यंत कायम वादातच राहिला आहे. आजही या ठिकाणी महामार्गाच्या शेजारी वन विभागाने महामार्गालाच्या रुंदीकरणाला आवश्यक पूर्ण जागा संपादन करू दिलेली नाही. यामुळे खिंडीत मूळ महामार्गापेक्षा अरुंद रस्ता राहणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीतील ज्या ठिकाणी चौपदरीकरणासाठी अपुरी जागा आहे. त्या ठिकाणचा दोन्ही कडील भाग हा डोंगराचा व खडकाचा असल्याने तसेच अरुंद असल्याने व समोरून येणारे वाहन या वळणावर समजणे वाहन चालकाला दुरापास्त होणार आहे. यामुळे या ठिकाणी दिवसा बरोबरच रात्रीच्या वेळेस मोठा व गंभीर अपघात हा होणार आहे. सद्या येथील काम ठेकेदार कंपनी सुरु करून ते काम घाईने आटोपते घेण्याच्या तयारीत आहे.
महाड तालुक्यातील दासगाव खिंडीतील रस्ता ज्या ठिकाणी अरुंद व अवघड वळण असल्याने या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या अधिकाऱ्यांनी चौपदरीकरणाचे काम करताना नेमकी कोणती सुधारणा केली हा संशोधनाचा विषय आहे. दासगाव खिंडीतील चढ कमी करून महामार्ग सरळ रेषेत नेणे याकरिता समोर आलेली वन विभागाची जागा संपादित करणे गरजेचे होते. मात्र याठिकाणी आडकाठी असल्याने जुन्या वळण मार्गानेच रुंदीकरण करत महामार्ग नेला असल्याने पूर्वीचेच वळण हे धोकादायक स्थितीमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करण्यापूर्वी ज्या विभागाकडून या जागेचे सर्व्हेक्षण झाले ते सर्व्हेक्षण आता चुकीचे असल्याचे निष्पन्न होत आहे. सर्वेक्षण करताना स्थानिक ग्रामस्थांना अथवा या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थानिक रहिवाशांचे कोणतेही म्हणणे न ऐकून घेता अनेक चुकीच्या ठिकाणी संपादन करून महामार्ग अन्य जागेतून नेण्यात आला आहे. वन विभागाकडून परवानगी सहज मिळणे शक्य नसताना याठिकाणी महामार्ग कसा वळवता येईल याचा विचार झाला नाही. अशीच स्थिती मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी झाली आहे. रस्त्यातील वळणे सहजरित्या काढून वळणदार मार्गाला बगल देता आली असती. दासगाव खिंडीतील हे काम सध्या सुरु केले असले तरी वळण आणि चढउतार मात्र पूर्वीच्या पद्धतीने कायम राहिल्याने अपघाताची शक्यता कायम राहिली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीतील धोकादायक वळण हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅकस्पॉट ठरणार असताना या जिल्ह्यातून या रस्त्यावरून जाणारे राज्यातील व केंद्रातील मंत्री या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार तसेच या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व तमाम कोकणातील विधानसभा, विधानपरिषद व राज्यसभा व लोकसभेचे खासदार यांनी डोळ्यावर काळीपट्टी बांधली होती का? असा सवाल
गावातील ग्रामस्थांसहित या महामार्गावरून प्रवास करणारे लाखो चाकरमानी राज्य शासनाला तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला व विशेषतः या महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्याची हमी घेतलेले केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांना विचारीत आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीतील रस्त्याचे काम पूर्ण करून सदरची कंपनी गेल्यानंतर या ठिकाणच्या ब्लॅकस्पॉटमुळे महामार्गावर दररोज अपघात होऊन प्रवाशांचे बळी गेल्यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकार व कोकणातील लोकप्रतिनिधींसह या विधानसभा मतदार संघातील व या लोकसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींना जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
