सलीम शेख
माणगाव : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी माणगाव येथील यशोधरा गोडबोले यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा चित्रा वाघ यांनी करून त्यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र आपल्या सहीनिशी दिले आहे. यशोधरा गोडबोले यांची भाजप पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. गोडबोले यांना दिलेल्या या नियुक्तीपत्रात असे म्हटले आहे कि, भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्याकरिता प्रदेश महिला मोर्चाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारे काम कराल असा विश्वास व्यक्त करीत यशोधरा गोडबोले यांना नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यशोधरा गोडबोले या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून त्यांनी भाजपचे माणगाव तालुका महिला मोर्चाचे अध्यक्ष तसेच तालुका उपाध्यक्ष म्हणून गेली नऊ वर्ष चांगल्या प्रकारे काम केल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांना बढती देऊन राज्यावर मानवाधिकार सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी सलग दुसऱ्यांदा दिली आहे. शिवाय नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी माणगावच्या यशोधरा गोडबोले यांची भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली असून तशी माहिती चित्रा वाघ यांनी गोडबोले यांना इंस्टाग्रामवर ट्विट करीत दिली आहे. यशोधरा गोडबोले यांनी भाजप पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून त्यांनी बहुजन समाजातील गोरगरीब लाभार्थी जनतेला केंद्र व राज्यसरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच पक्षातर्फे महिलांसाठी आपल्या सहकारी महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम त्या राबवित असतात. महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या सचिव म्हणून भाजप संघटनतर्फे यशोधरा गोडबोले यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.
आपली प्रदेश महिला मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल प्रसार माध्यमांजवळ बोलताना यशोधरा गोडबोले म्हणाल्या कि, पक्षश्रेष्ठीनी माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा महिला कार्यकर्त्यावर प्रदेशवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने मी सर्व पक्षश्रेष्टींचे मनापासून ऋण व आभार व्यक्त करीत आहे. ज्याप्रमाणे मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सचिव, भाजप महिला मोर्चाचे माणगाव तालुकाध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निष्ठेने काम पाहिले त्याचपरीने या पदाला न्याय देत माझ्या सहकारी महिलांना सोबत घेऊन पक्षसंघटन अधिकतम बळकट करून बहुजन समाजातील गोरगरीब जनतेसाठी दिवसरात्र एक करून काम करेन. संघटना वाढीबरोबरच बहुजन समाजातील जनतेला आजपर्यंत ज्या पद्धतीने शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ मिळवून दिला आहे तसा लाभ या जनतेला यापुढेही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.
