गणेश पवार
कर्जत : कर्जतच्या पोलीस मैदानावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेची पूर्व तयारी कशी झाली आहे याची पाहणी करण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सभा स्थळी येऊन पाहणी करून काही सूचना सुद्धा केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे अजित पवार गटात सामील झाले तर माजी आमदार सुरेश लाड शरद पवार गटात राहिले. गेल्या आठवड्यात लाड आपल्या समर्थकांसमवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. मात्र काही अडचणींमुळे त्यांचा भाजपा प्रवेश लांबणीवर गेला. घारे अजित पवार गटात गेल्यानंतर सातत्त्याने काही ना काही कार्यक्रमांचे आयोजन करून चर्चेत राहिले आहेत.
पक्षाचे कार्यालय असावे म्हणून त्यांनी विठ्ठल नगरमध्ये सुसज्ज पक्ष कार्यालय उभारले. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पोलीस मैदानात निर्धार सभा होणार आहे. या सभेची पूर्वतयारी कितपत झाली आहे त्याची पाहणी व माहिती घेण्यासाठी अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांनी सभा स्थळाला भेट देऊन पाहणी केली व माहिती घेऊन काही सूचना केल्या. याप्रसंगी राजीपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, प्रदेश प्रतिनिधी व शहराध्यक्ष भगवान भोईर, जिल्हा सरचिटणीस ॲड. राजेंद्र निगुडकर, तालुका महिला अध्यक्ष ॲड. रंजना धुळे, प्रकाश पालकर, तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, तालुका उपाध्यक्ष मधुकर घारे, समीर देशमुख, बंडू तुरडे आदी उपस्थित होते.
