बेस्ट रेडर श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाचा मंथन अनंत म्हात्रे
विनायक पाटील
पेण : रायगड जिल्हा कुमार गट निवड व अजिंक्यपद 2023 कबड्डी स्पर्धेत श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाने अजिंक्यपद पटकावले आहे. बेस्ट रेडर म्हणून श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाचा उगवता तारा मंथन अनंत म्हात्रे याला गौरविण्यात आले.
रायगड जिल्हा कुमार गट निवड चाचणी 2023 स्पर्धा पेझारी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील १२८ मातब्बर संघ सहभागी झाले होते. श्री गणेश क्रीडा मंडळाचे प्रसिद्ध खेळाडू व प्रशिक्षक सिद्धार्थ पाटील, समीर म्हात्रे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्कीच्या खेळाडूंनी या स्पर्धेत शिस्तबद्ध पद्धतीने डावपेच आखत एक एक सहज विजय प्राप्त करीत अंतिम सामन्यात अतिशय ताकदवान रोहा तालुक्यातील गावदेवी रोठ बुद्रुक संघावर आतितटीच्या सामन्यात लिलया मात करीत विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीत श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाने जय हनुमान धेरंड संघाचा ११ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरी प्रवेश केला होता. अंतिम फेरीत गावदेवी रोठ बुद्रुक रोहा संघावर ६ गुणांनी मात करून अंतिम विजेता ठरला. या स्पर्धेत वनमॅन शो करीत श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की चा उगवता तारा मंथन अनंत म्हात्रे याने चढाईत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याला उत्कृष्ट चढाईपटू म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वराज रुपेश गावंड, सिध्देश कनोज म्हात्रे व इतर खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत मंथन म्हात्रे याला साथ दिली.
श्री गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदेश पाटील यांनी विजेतेपद मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मंडळाच्या सर्व खेळाडूंनी प्रशिक्षक सिद्धार्थ पाटील आणि समीर म्हात्रे यांनी रचलेल्या डावपेचामुळे हे यश मिळाले आहे. मेहनत घेऊन केलेला सराव, जिद्दीने ठरवलेल्या महत्वकांक्षेने हा इतिहास घडविला आहे. त्याचे फळ अंतिम विजेतेपद स्वरूपात मिळाले आहे. श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्कीच्या खेळाडूंनी शिर्की ग्रामस्थांसह पेण तालुक्याला एक अविस्मरणीय भेट दिली असल्याची भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य कुमार गट कबड्डी अजिंक्य पद स्पर्धेत रायगड जिल्हाच्या संघात श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्कीचे कु. मंथन अनंत म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे.
