अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात रविवारी ( दि. २६) पहाटे विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे उरणमधील प्रदूषणाच्या मात्रेत घट झाली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र अचानक आलेल्या पावसामुळे गुरांचा चारा ( भाताचा पेंढा) भिजला असून वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान झाले आहे.
रविवारी (दि. २६) पहाटे साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अर्धा ते पाऊण तास सुरू होता. मात्र पाऊस गेला म्हणून निवांत झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी मळणी करून भाताचा पेंढा ढीग करून ठेवला होता. हा पेंढा ओला झाला आहे. तर काही शेतातील भात पीक ही कापणी करण्याचे राहिले असून त्याचेही नुकसान या अवेळी पावसाने केले आहे. तसेच वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान झाले असल्याने वीटभट्टी व्यवसायिक, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
